Attack in Pakistan
पाकिस्तानमध्ये शनिवारी (दि.२८ जून) झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान १६ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. तर अनेक लोक जखमी झाले, असे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने स्थानिक सरकारी अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात ही घटना घडली आहे.
'या घटनेत एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन सैनिकांच्या ताफ्यावर धडकवले,' असे खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील एका स्थानिक सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. या हल्ल्यात १६ सैनिक ठार झाले आहेत.
हा स्फोट इतका भीषण होता की दोन घरांचे छप्परही कोसळले. यामुळे ६ मुले जखमी झाली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने एएफपीशी बोलताना सांगितले. दरम्यान, हाफिज गुल बहादूर या सशस्त्र गटाच्या आत्मघातकी बॉम्बर गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा पाकिस्तान तालिबानचा एक गट मानला जातो.
अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सीमाभागात गेल्या काही दिवसांत हिंसाचारात वाढ झाली आहे. पाकिस्तानने तालिबानवर पाकिस्तानविरुद्ध हल्ला करण्यासाठी त्यांच्या भूमीचा वापर करण्यास परवानगी दिल्याचा आरोप केला आहे. पण हा आरोप तालिबानने फेटाळला आहे.
खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये सरकारविरुद्ध लढणाऱ्या सशस्त्र गटांच्या हल्ल्यात यावर्षी सुमारे २९० जण ठार झाले आहेत. यात बहुतांश सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.