नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : इंधन श्रेणीतील सर्वच वस्तुंच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. सरत्या सप्टेंबर महिन्यात सर्वसाधारण महागाई दरात (डब्ल्यूपीआय) ( Inflation Rate ) किरकोळ घट झाली आहे. ऑगस्टमधील 11.39 टक्क्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये महागाई दर ( Inflation Rate ) 10.66 टक्के इतका नोंदविला गेला. सलग सहाव्या महिन्यात डब्ल्यूपीआय निर्देशांक दहा टक्क्यांवर वर राहिलेला आहे.
सप्टेंबरमध्ये इंधन आणि ऊर्जा श्रेणीच्या निर्देशांकात 24.81 टक्क्यांची तर निर्मिती क्षेत्राच्या निर्देशांकात 11.41 टक्क्याची वाढ नोंदविण्यात आली असल्याची माहिती उद्योग आणि व्यापार मंत्रालयाकडून देण्यात आली. दुसरीकडे खाद्यान्न श्रेणीच्या निर्देशांकात 1.14 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ( Inflation Rate )
किरकोळ ग्राहक निर्देशांकात 4.4 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे सरकारकडून अलिकडेच सांगण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅससह इंधन आणि ऊर्जा क्षेणीतील सर्वच वस्तुंच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे डब्ल्यूपीआय निर्देशांक अजूनही चढ्या स्तरावर असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मिनरल ऑईल, गैरखाद्य श्रेणीतील वस्तू, खाद्यपदार्थ, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रसायने व निर्मिती क्षेत्राशी संबंधित विविध वस्तुंच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ नोंदविण्यात आलेली आहे.
सप्टेंबरमध्ये कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या दरात 40.03 टक्क्यांच्या तुलनेत 43.92 टक्क्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. महागाई दर चढा असला तरी रिझर्व्ह बँकेने रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय अलिकडेच घेतला होता.