यशवंत सहकारी साखर कारखाना कोणाच्याही घशात जावू देणार नाही : राजू शेट्टी | पुढारी

यशवंत सहकारी साखर कारखाना कोणाच्याही घशात जावू देणार नाही : राजू शेट्टी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना चालू व्हावा असे कारखान्याच्या सर्व सभासदांना वाटते. मात्र, हा कारखाना कधी एकदा नेस्तनाबूत होईल, लिलावात निघेल आणि येथील जमीन आम्ही हडप करु म्हणून काही लांडगे याठिकाणी दबा धरुन बसलेले आहेत. या कारखान्याचे सभासद शेतकरीही तितकेच खंबीर आहेत, काहीही झाले तरी कारखाना कोणाच्या घशात जावू देणार नसून जनआंदोलन उभे करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी दिला.

‘जागर एफआरपीचा आराधना शक्तिपीठांची’ या राज्यभर सुरु असलेल्या यात्रेनिमित्त ते थेऊरला आले होते. सकाळी त्यांनी थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेतले. त्यानंतर यशवंत कारखाना स्थळावर भेट देऊन कारखान्याच्या झालेल्या दुरावस्थेची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी पांडुरंग काळे, एकनाथ काळे, रमेश कुंजीर, पुखराज कुंजीर, रामभाऊ कुंजीर, काशिनाथ काळे, रमेश काळे, गंगाराम कुंजीर, गणेश रसाळ, मोरेश्वर काळे, अन्य शेतकरी सभासद व अ‍ॅड योगेश पांडे आदी उपस्थित होते.

यशवंत सहकारी साखर कारखाना : जिथे सहकार रुजला तिथेच माती झाली

जिथे कधी काळी सहकार रुजला, शेतकरी, कामगारांनी घाम गाळला, तिथे आज जंगल उभे राहिले आहे. सहकाराचे वाटोळे राज्यात कसे झाले याचे उदाहरण म्हणजे थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना होय असे नमूद करुन ते म्हणाले की, यशवंतवरील तथाकथित कारखान्यावरील कर्ज आहे, ते दयायचेच ठरवीले तरी त्या कर्जाच्या दहापट या कारखान्याची मालमत्ता आहे. या कारखान्याची जमीन म्हणजे सोन्याचा तुकडा आहे.

एखाद्या साध्या माणसाने जरी या जमिनीचा थोडा तुकडा जरी विकला असता तरी कर्ज फिटले असते. या कारखान्याची डिस्टलरी आहे, गोदामे भाड्याने दिले असते तरी काही अंशी कर्ज फिटले असते. वारंवार आमच्या सभासदांनी विचारले की, आमच्या कारखान्यावर नेमके किती कर्ज आहे? याची विचारणा केली तरी कोणत्याच बँकेने प्रतिसाद दिला नाही. मी स्वतः कारखान्याच्या सभासदांच्या वतीने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशीही पत्रव्यवहार केलेला आहे.

यशवंत कारखान्याचे संस्थापक स्व. अण्णासाहेब मगर यांनी या परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी साखर कारखान्याची उभारणी केली. यशवंत कारखाना ही सहकाराची दौलत असून कोणाच्या तरी अट्टासाठी ही दौलत सडत पडल्याची टीका त्यांनी केली.

ठेवी आणि लोकवर्गणीतून कारखाना पुन्हा उभा करु…

बँकांचे कर्ज फेडण्यासाठी भागभांडवल वाढवून देण्यासाठी ठेवींची रक्कम वाढविण्यास शेतकरी सभासद तयार आहेत. असे असताना सरकार त्यास प्रतिसाद का देत नाही? असा आमचा प्रश्न आहे. याऊलट ज्या संचालकांनी भ्रष्टाचार करुन बंद पडलेला कारखाना सभासदांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी आणि ठेवींच्या माध्यमातून पुन्हा सुरु केला तर राज्यात आदर्श उभा राहील असेही शेट्टी यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

Back to top button