नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाला २०१३-१४ मध्ये टोल आकारणीतून ४ हजार ४७० कोटींच्या महसूल मिळत होता. आता हा महसूल ४१ हजार ३४२ कोटींवर पोहचला आहे. तंत्रज्ञानाच्या वापरातून टोल वसुलीत पारदर्शकता आली आहे, असा दावा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ( India's road network ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या ९ वर्षपुर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली.
टोल नाक्यांवरील प्रतीक्षा वेळ आली सरासरी ४७ सेकंदावर
मोदी सरकार सत्तेत आले तेव्हा टोल नाक्यांवर वाहनांची प्रतीक्षा वेळ सरासरी ७३४ सेकंद होती. आता २०२३ मध्ये ही प्रतीक्षा वेळ सरासरी ४७ सेकंदावर आली आहे. टोल नाक्यांवरील तक्रारी कमी झाल्या असून, आता ही प्रतीक्षा वेळ ३० सेकंदांहून कमी होईल, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला. २०२३ पर्यंत टोल आकारणीतून मिळणारा महसूल १ लाख ३० हजार कोटींपर्यंत पोहचवण्याचा मानस असल्याचे गडकरी म्हणाले.
देशात सरासरी दररोज ११.०६ किलोमीटर रस्ते बांधली जात होती. मोदी सरकारच्या काळात हे प्रमाण २० किमी पर्यंत पोहचले आहे. २०२०-२१ मध्ये हे प्रमाण ३७ किलोमीटर पर्यंत पोहचले होते. पंरतु, कोरोना काळामुळे रस्ते बांधकामाचा वेग मंदावल्याचे गडकरी म्हणाले.
मंत्रालयामध्ये रस्ते बांधकामासाठी विविध मॉडेलचा वापर केला जात आहे.विशेष म्हणजे मंत्रालयाने आतापर्यंत ३ लाख कोटींच्या एनपीएपासून बॅंकांना वाचवल्याचा दावा देखील गडकरींनी केला. बाजारातील एनएचआयएवरील विश्वास वाढला आहे. इनव्हिट मॉडेलच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या पैशातून महामार्गांची उभारणी केली जात असल्याचे गडकरी म्हणाले.
दिल्ली शेजारील राज्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात पाचट जाळत असल्याने प्रदूषणात वाढ होते. पंरतु, हरियाणात आता पाचटच्या माध्यमातून इथेनॉल आणि बायो 'एव्हिएशन फ्यूल' बनवले जाईल.यामुळे अगोदर फुक्कट मिळणाऱ्या पाचटाचे दर अडीच हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहचले असल्याचे गडकरी म्हणाले.
अमेरिकेनंतर सर्वात मोठा रस्त्यांचे जाळे भारतात आहे. देशात ९१ हजार २८७ किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे होते. यात १८ हजार ३३१ किलोमीटर चौपदरी (२०%) रस्ते होते. आता हे मार्ग ४४ हजार ६५४ किलोमीटर पर्यंत पोहचले आहे. यात ३१% वाढ झाली आहे. दुपदरी मार्गाची लांबी ४५ हजार ३१९ (५०%) किलोमीटर होती. आता हे मार्ग ८३ हजार ९४१ किलोमीटर पर्यंत पोहचले असल्याची माहिती गडकरींनी दिली.
हेही वाचा :