Latest

देशातील कोरोनाची तिसरी लाट ओसरली, दैनंदिन रुग्णसंख्या १० हजारांच्या खाली

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशातील कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या १० हजारांच्या खाली आली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८,०१३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ११९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १६,७६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात १ लाख २ हजार ६०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ४ कोटी २३ लाख ७ हजार ६८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनाने आतापर्यंत ५ लाख १३ हजार ८४३ जणांचा बळी घेतला आहे. देशातील कोरोना संसर्ग दर १.११ टक्के एवढा आहे. दरम्यान, देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. आतापर्यंत १७७ कोटी ५० लाख ८६ हजार ३३५ डोस देण्यात आले आहेत.

याआधीच्या दिवशी देशात कोरोनाचे १०,२७३ नवे रुग्ण आढळून आले होते. तर २४३ जणांचा मृत्यू झाला होता. दिवसभरात २०,४३९ रुग्ण बरे झाले होते. कोरोना संसर्ग दर १ टक्के होता. तर आठवड्याचा संसर्ग दर १.२६ टक्क्यांवर होता. दरम्यान, शनिवारी देशभरात कोरोनाच्या १० लाख २२ हजार २०४ चाचण्या झाल्या होत्या. आतापर्यंत देशात ७६ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दिल्लीत कोरोना धोका कमी झाला आहे. येथे शनिवारी ४४० रुग्णांची नोंद झाली होती. तर दोघांचा मृत्यू झाला होता. येथे कोरोना संसर्ग दर ०.८३ टक्क्यावर आला आहे.

आता तीनवेळा खोकून होणार कोरोनाचे निदान!

सध्या कोरोना संक्रमणाचे निदान लावण्यासाठी 'आरटी-पीसीआर' टेस्ट आणि रॅपिड अँटिजेन टेस्टचा वापर केला जातो. आता स्वीडनच्या संशोधकांनी म्हटले आहे की ब्रेथ टेस्ट म्हणजेच श्‍वासाच्या चाचणीतूनही कोरोना संक्रमण समजू शकते. विशेषतः विशिष्ट उपकरणात तीनवेळा खोकल्यावर अधिक चांगल्याप्रकारे कोरोनाचे निदान होऊ शकते. 'एन्फ्युएंझा अँड अदर रेस्पिरेटरी व्हायरस' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. गोथेनबर्ग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी 'पार्टिकल्स इन एक्सहेल्ड एअर' आणि ब्रेथ एक्सप्लोअर' नावाची उपकरणे विकसित केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT