Latest

US | अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सापडला मृतदेह

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील (US) जॉर्जियामध्‍ये २५ वर्षीय भारतीय विद्यार्थी विवेक सैनी याची एका बेघर माथेफिरुने हत्‍या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना आता आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील इंडियाना राज्यातील पर्ड्यू विद्यापीठात (Purdue University in Indiana state of the US) शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी मंगळवारी केली. नील आचार्य (Neel Acharya) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पर्ड्यू विद्यापीठाच्या जॉन मार्टिनसन ऑनर्स कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्समध्ये दुहेरी शिक्षक घेत असलेला हा विद्यार्थी रविवारी सोशल मीडियावर बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गेली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सापडला आहे.

सोमवारी विद्यापीठाच्या संगणक विज्ञान विभागाला पाठवलेल्या ईमेलमध्ये इंटरिम सीएस प्रमुख ख्रिस क्लिफ्टन यांनी आचार्य याच्या मृत्यूची माहिती विद्यार्थी आणि प्राध्यापकांना दिली, असे वृत्त द एक्सपोनंटने दिले आहे.

"मला हे कळवताना अत्यंत दुःख होत आहे की, आमचा एक विद्यार्थी नील आचार्य यांचे निधन झाले आहे,"क्लिफ्टन यांनी म्हटले आहे. "त्याचे मित्र, कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत," असेही त्यांनी पुढे नमूद केले.

द एक्सपोनंटशी बोलताना क्लिफ्टन म्हणाले की, त्यांना आचार्य यांच्या मृत्यूची पुष्टी करणारा डीन ऑफ स्टुडंट्सच्या कार्यालयाकडून आलेला ईमेल प्राप्त झाला. "एका व्यक्तीचा मृतदेह सापडला असून तो नीलच्या वर्णनाशी जुळतो आणि त्याचे ओळखपत्र सापडले आहे," असेही ते म्हणाले.

माझ्या मुलाच्या शोधासाठी मदत करा, आईने केले होते आवाहन

याआधी सोमवारी X वरील एका पोस्टमध्ये नीलची आई गौरी आचार्य यांनी २८ जानेवारी रोजी १२:३० वाजल्यापासून (स्थानिक वेळेनुसार) बेपत्ता असलेल्या आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी मदत मागितली होती. "आमचा मुलगा नील आचार्य २८ जानेवारीपासून बेपत्ता आहे. तो अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिकत आहे. त्याला उबरच्या चालकाने अखेरचे पाहिले होते ज्याने त्याला पर्ड्यू विद्यापीठात सोडले होते. आम्ही त्याच्याविषयी माहिती घेत आहोत. तुम्हाला काही माहिती असल्यास कृपया आम्हाला मदत करा," अशी विनंती त्यांनी X वरील पोस्टमधून केली होती.

त्यांच्या पोस्टला उत्तर देताना, शिकागोमधील भारताच्या वाणिज्य दूतावासानी म्हटले होते, "(द) वाणिज्य दूतावास पर्ड्यू विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या आणि नीलच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. वाणिज्य दूतावास सर्व शक्य ते सहकार्य आणि मदत करेल".

हे ही वाचा ;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT