Latest

अभिमानास्‍पद! डोडा येथे भारतीय लष्‍कराने फडकवला १०० फूट उंच तिरंगा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय लष्‍कराने आज ( दि. ९) जम्‍मू-काश्‍मीरमधील डोडा येथे १०० फूट उंच तिरंगा फडकवला. देशासाठी प्राणाहुती देणार्‍या जवानांना ही एक श्रद्धांजली असल्याचे लष्‍करातील वरिष्‍ठ अधिकार्‍यांनी म्‍हटले आहे. चिनाब खोर्‍यात लष्‍कराने फडकवलेला हा दुसरा सर्वात उंच राष्‍ट्रध्‍वज ठरला आहे.

सर्वाधिक दहशतवादी कारवाया होणारा जिल्‍हा अशी डोडाची एक दशकापूर्वी ओळख होती. मात्र मागील काही वर्षांमध्‍ये येथील लष्‍कराच्‍या धडक कारवाई करत ही ओळख आता बदलली आहे. आज लष्कराच्या डेल्टा फोर्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अजय कुमार, राष्ट्रीय रायफल्सचे कमांडर ब्रिगेडियर समीर के पलांडे, डोडा उपायुक्त विशेष पॉल महाजन आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक अब्दुल कयूम यांच्‍या उपस्‍थितीत डोडा क्रीडा स्टेडियमवर १०० फूट उंच तिरंगा फडकविण्‍यात आला.

शहीद झालेल्‍या  सैनिकांना श्रद्धांजली

या वेळी मेजर जनरल कुमार यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला. ते म्हणाले, " १०० फूट उंच राष्‍ट्रध्वज फडकवणे ही चिनाब खोऱ्यात शहीद झालेल्‍या सैनिकांना श्रद्धांजली आहे. ज्यांनी राष्ट्राची एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. डोडा येथे अशा प्रकारचा पहिला 100 फूट उंच राष्ट्रध्वज हा केवळ लष्करासाठीच नाही तर डोंगरी जिल्ह्यातील सर्व रहिवाशांसाठीही अभिमानास्पद क्षण आहे. हा राष्ट्रध्वज पाहिल्‍यानंतर प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल, असेही त्‍यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी नायब सुभेदार चुन्नीलाल अशोक चक्र (मरणोत्तर) यांच्या पत्नी चिंता देवी म्हणाल्या, "सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे बलिदान ते कधीही विसरत नाही हे आपल्या सैन्याचे वैशिष्ट्य आहे." २००७ मध्ये कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांशी लढताना नायब सुभेदार चुन्‍नीलाल शहीद झाले होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT