MahaBudget 2023 : राज्यातील ७५ हजार रिक्त पदे भरण्याची शासनाची मोहीम | पुढारी

MahaBudget 2023 : राज्यातील ७५ हजार रिक्त पदे भरण्याची शासनाची मोहीम

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून शासनाच्या नियंत्रणाखालील आस्थापनांमध्ये रिक्त असलेली ७५ हजार पदे भरण्याची मोहीम शासनाने हाती घेतल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्याचा सन 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प आज (दि.९) विधिमंडळात सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच अर्थसंकल्प मांडला. राज्यात सत्तेत येऊन शिंदे सरकारला जवळपास आठ महिने पूर्ण झाले आहेत. या आठ महिन्यांत शिंदे यांनी निर्णयांचा धडाका लावला. त्यामुळे त्यांच्या या कार्यशैलीचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटेल, अशी अपेक्षा होती. या पार्श्वभूमीवर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. संपूर्ण राज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे ७०० आपला दवाखाना सुरू केले जाणार आहेत. त्यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा व उपचार करण्यात येणार आहेत. अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी ३ हजार ५२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनाकरीता ३०० कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन ८३२५ रूपयांवरून १० हजार करण्यात आले. अंगणवाडी मदतनीसांचे मानधन ४४२५ वरून ४५०० रूपये करण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणाही त्यांनी केली.

Back to top button