पुढारी ऑनलाईन डेस्क: ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) या इस्लामिक देशांच्या संघटनेला भारताने पुन्हा एकदा फटकारले आहे. काश्मीरबाबत वारंवार वादग्रस्त विधानाने करणार्या या संघटनेच्या महासचिवांनी सोमवारी ( दि.१२) पाक व्याप्त काश्मीरचा ( पीओके) दौरा केला. याचेळी त्यांनी पाक व्याप्त काश्मीरप्रश्न आपलं मतही व्यक्त केले. यावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने 'ओआयसी'च्या या कृतीचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.
या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी स्पष्ट केले आहे की, "ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन या संघटनेच्या महासचिवांनी पाक व्याप्त काश्मीरचा दौरा केला आहे. या वेळी त्यांनी जम्मू-काश्मीरवर केलेल्या टिप्पणीचे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. या संघटनेचा आणि जम्मू-काश्मीर मुद्याशी काहीही संबंध नाही. जम्मू-काश्मीर हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे. भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये दखल देण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे."
ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन या संघटनेने यापूर्वीच आपली विश्वासहर्ता गमावली आहे. ही संघटना वारंवार धार्मिक, एकतर्फी आणि निराधार माहितीचा प्रसार करत आहे. दुर्दैवाने या संघटनेचे महासचिव हे पाकिस्तानचे प्रवक्ते झाले आहेत.
सोमवारी 'ओआयसी'चे महासचिव हिसेन ताहा यांनी पाक व्याप्त काश्मीरचा दौरा केला. काश्मीर प्रश्न हा आमच्या अजेंडावरील सर्वोच्च मुद्दा आहे. आमची संघटना काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चे होण्यासाठी मार्ग काढत आहे. काश्मीर प्रश्नी अन्य देशांनीही आता आमच्या सोबत यावे, असे विधान त्यांनी केले होते. या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे काश्मीरचे सल्लागार कमर जमान कायरा उपस्थित होते.
'ओआयसी' या संघटनेची स्थापना १९६९ मध्ये झाली. पाकिस्तान काश्मीर प्रश्नासाठी वारंवार 'ओआयसी'च्या व्यासपीठाचा वापर करतो. केंद्र सरकारने काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले होते. या विरोधातही या संघटनेने ठराव केला होता. या वेळीहड भारताने या संघटनेला फटकारले होते.
हेही वाचा :