पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट असो की हॉकी प्रत्येक महत्त्वाच्या स्पर्धेत आजवर न्यूझीलंडचा संघ भारतासाठी मोठा अडसर ठरला होता. मात्र याच संघाच्या झुंझार खेळीमुळे श्रीलंकेचा पराभव झाला आणि टीम इंडिया कसोटी क्रिकेट चॅम्पियनशीपच्या फायलनमध्ये पोहचला. जाणून घेवूया न्यूझीलंड संघ कोणत्या सामन्यांमध्ये भारतासाठी 'व्हिलन' ठरला आणि आज कसा 'हिरो' झाला या सामन्यांविषयी….
२०२३ हॉकी स्पर्धेत भारतीय संघाची वाटचाल दमदार सुरु होती. ग्रुप डीमधील भारतीय संघाने दोन सामने जिंकले तर
इंग्लंडविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी भारताला क्रॉस-ओव्हर सामना खेळावा लागला. हा सामना जिंकला असता तर भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असता. भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. कारण हॉकीमध्ये आपल्या संघाची कामगिरी नेहमीच न्यूझीलंडपेक्षा सरस राहिली आहे. मागील सर्व रेकॉर्डही भारताच्या बाजूने होते. तरीही पूर्णवेळ खेळ होईपर्यंत दोन्ही संघांमधील सामना 3-3 असा बरोबरीत राहिला. या सामन्यात टीम इंडियाचे वर्चस्व असले तरी न्यूझीलंड संघाने कडवी झुंज दिली. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने 5-4 असा विजय मिळवला. भारताचा विश्वचषकातील प्रवास थांबला होता. न्यूझीलंड संघाच्या या कामगिरीमुळे हॉकी विश्वचषक 2023 मधील भारताच्या प्रवासाला पूर्णविराम मिळाला होता. तसेच भारतीय हॉकीप्रेमींचे १९७५ नंतर पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले होते.
२०२१ मध्ये T20 विश्वचषकात स्पर्धेत भारतीय संघात न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा समावेश होता. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर स्पर्धेत आपले अस्तित्व टिकण्यासाठी भारताला न्यूझीलंडचा पराभव करणे अनिवार्य होते; पण पुन्हा एकदा न्यूझीलंड संघ 'भिंत' म्हणून भारतासमोर उभा राहिला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताला छोट्या धावसंख्येवर रोखले आणि त्यानंतर किवी फलंदाजांनी लक्ष्य सहज गाठले. या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या आशाच संपुष्टात आल्या आहेत. टीम इंडियाने उर्वरित सर्व सामने जिंकले, मात्र न्यूझीलंड विरुद्धचा पराभव हाच उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी मुख्य अडसर ठरला आणि भारतासाठी न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा 'व्हिलन' ठरला.
कसोटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने धडक मारली. टीम इंडिया सवोत्कृष्ट कसोटी खेळत होती.
न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामना १८ ते २३ जून २०२१ दरम्यान इंग्लंडच्या साउथहँप्टन मधील रोझ बोल खेळवला गेला. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने सर्वोत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव करत पहिला वहिला कसोटी विश्वचषक जिंकला आणि पुन्हा एकदा भारताला विश्वचषकापासून लांब राहावे लागले.
२०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ हा प्रमुख दावेदार मानला जात होता. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकून टीम इंडिया सहज फायनलमध्ये पोहचेल, असा अंदाज क्रिकेटप्रेमी व्यक्त करु लागले. मात्र उपांत्य फेरीत उलटपेर झाला. न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव करुन फायनलमध्ये धडक दिली. संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व गाजवणाऱ्या भारताला न्यूझीलंडने स्पर्धेबाहेर काढत देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का दिला होता.
क्रिकेट असो की हॉकी, विश्वचषक स्पर्धेतील महत्त्वपूर्ण सामन्यात भारताचा स्वप्नभंग करण्यासाठी न्यूझीलंडचा संघच कारणीभूत ठरला होता. मात्र आज हाच संघ भारतासाठी हिरो ठरला. कारण कसोटी क्रिकेटच्या गुणतालिकेत अग्रस्थानी असणारा ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रिकेट चॅम्पियनशीप फायनलमध्ये यापूर्वीच पोहचला होता. भारत दुसर्या तर श्रीलंका तिसर्या स्थानी होते.
श्रीलंकेला अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी न्यूझीलंड विरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागणार होते. तर भारताला अहमदाबाद येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत विजय मिळवणे अनिवार्य होते. मात्र भारत-ऑस्ट्रेलियामधील चौथ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी या सामन्याची वाटचाल अनिर्णितकडे सुरु झाली होती. तर श्रीलंका आणि न्यूझीलंड कसोटी मालिकेतील पहिला सामना हा रंगदार अवस्थेत होता. हा सामन्या श्रीलंकेने जिंकला असता तर या संघाच्या कसोटी क्रिकेट चॅम्पियनशीपच्या फायलनमध्ये पोहचण्याच्या अशा कायम राहिल्या असत्या.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यात काय घडलं ?
मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा पहिला डाव ३५५ धावांमध्ये संपुष्टात आला. न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली होती. ५ गडी गमावत १६५ धावा केल्या. यानंतर डॅरेल मिशेल याने दमदार शतक झळकावले. मिशेलच्या खेळीमुळे न्यूझीलंडचा संघाने पहिल्या डावात ३७३ धावापर्यंत मजल मारली. तसेच पहिल्या डावात १८ धाांची आघाडीही घेतली. श्रीलंका संघाचा दुसऱ्या डाव ३०२ धावांवर आटोपला.
न्यूझीलंडला मालिकेतील पहिली कसोटी जिंकण्यासाठी २८५ धावांचे आव्हान होते. टॉम लॅथमनंतर डॅरिल मिशेल आणि केन विलियमसन यांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत न्यूझीलंडचा विजयाचा मार्ग सुकर केला. मिशेल ८१ धावांवर बाद झाला.पहिल्या कसोटी सामन्यातील दुसर्या डावात न्यूझीलंडच्या केन विलियमसन याने शतकी खेळी केली. एकीकडे विकेट जात असताना त्याने प्रथम डॅरिल मिशेलच्या जोडीने दुसर्या डावाला आकार दिला. केन याने १७७ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर आपले शतक पूर्ण केले.
दुसर्या डावात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दुसर्या डावात श्रीलंकेच्या असिथा फर्नांडो ३ आणि प्रभात जयसूर्या दोन तर कसून रजिथा आणि लाहिरू कुमारा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मात्र अखेरच्या षटकापर्यंत केन विलियमसन याने केलेल्या झूंझार श्रीलंकेला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र अखेरच्या षटकात ८ धावा हव्या असताना न्यूझीलंडने दोन गडी राखत श्रीलंकेचा पराभव केला आणि भारताचा कसोटी क्रिकेट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
हेही वाचा :