पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जरी गमावला असला तरी अष्टपैलू अक्षर पटेलच्या (Akshar Patel) वादळी खेळीने सर्वांची वाहवा मिळवली. त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या 20 चेंडूत दोन चौकार आणि सहा षटकार लगावत अर्धशतक झळकावले. यादरम्यान, अक्षरचा स्ट्राईक रेट दोनशेहून अधिक होते.
अक्षर पटेलने श्रीलंकेविरुद्ध 65 धावांची तुफानी इनिंग खेळून मोठा विक्रम केला. तो 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने भारताचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाला मागे टाकले आहे. जडेजाने 2020 मध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 44 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याचबरोबर अक्षर पटेल हा टी 20 फॉरमॅटमध्ये 7 व्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक झळकावणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. यासह अक्षरने 20 चेंडूत अर्धशतक ठोकून विराट कोहली आणि शिखर धवनला मागे टाकले. कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध 21 चेंडूत तर, शिखर धवनने 22 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या होत्या.
तसेच अक्षर (Akshar Patel) हा भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा 5 वा खेळाडू ठरला. आतापर्यंत युवराज सिंग या प्रकरणात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 2007 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध अवघ्या 12 चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले होते. युवीशिवाय केएल राहुल 18, सूर्यकुमार यादव 18 आणि गौतम गंभीरने 19 चेंडूत अर्धशतके फटकावली आहेत. युवीच्या नावावर 20 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचे दोन विक्रमही आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध 20 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला.
अक्षर पटेलने 14 व्या षटकात वानिंदू हसरंगाच्या पहिल्या तीन चेंडूत तीन षटकार ठोकले. पहिला षटकार आणि दुसरा षटकार डीप विकेटच्या दिशेने तर तिसरा षटकार गोलंदाजाच्या डोक्यावरून लागवला. चौथ्या चेंडूवर त्याने एकच धाव घेतली. सूर्यकुमार यादवने 5 व्या चेंडूवर षटकार ठोकला. या षटकात एकूण 26 धावा वसूल करण्यात आल्या.
पुण्यातील एमसीए मैदानावर सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी अप्रतिम भागीदारी केली. सूर्या-अक्षर जोडीने 89 धावांची भागीदारी करत भारतीय संघाचा डाव सांभाळला. यासह या दोन्ही फलंदाजांनी विराट कोहली आणि हार्दिक पंड्या जोडीची भागीदारी मागे टाकली. 2021 साली इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट आणि हार्दिकने 70 धावांची भागीदारी केली होती.