IND vs NZ 
Latest

IND vs NZ : तिसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय, भारताने टी-२० मालिका १-० ने जिंकली

दीपक दि. भांदिगरे

पुढारी  ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना टाय झाला. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसरा सामना भारताने जिंकला होता. तिसऱ्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला. यामुळे या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताने धावसंख्येची बरोबरी साधली आणि सामना बरोबरीत संपला. यामुळे भारताने टी-२० मालिका १-० ने जिंकली आहे.

न्यूझीलंडने भारतासमोर १६१ धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडचा डाव दोन चेंडू शिल्लक असताना सर्व बाद १६० धावांवर आटोपला. डेव्हॉन कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्स यांच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने १५० धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची डावाची सुरुवात खराब झाली आहे. पहिल्या तीन षटकांत एकामागून एक असे तीन विकेट गेल्या. (IND vs NZ)

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी टीम इंडियात एक बदल केला असून वॉशिंग्टन सुंदरच्या जागी हर्षल पटेल याला संघात स्थान देण्यात आले.

भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने न्यूझीलंडच्या फिन ऍलनला 3 धावांवर पायचित केले. यामुळे दुसऱ्या षटकात न्यूझीलंडला विकेट गमवावी लागली. दरम्यान, न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी सुरुवातीला सावध खेळी केली. डेव्हॉन कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्सने अर्धशतक झळकावल्यानंतर आक्रमक फटकेबाजीला सुरूवात केली. न्यूझीलंडने १५ षटकांत १२८ धावा जमवल्या. दरम्यान, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलिप्स ५४ धावांवर झेलबाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याचा झेल टिपला. डेव्हॉन कॉन्वे याला अर्शदीप सिंंगने झेलबाद केले.  कॉन्वेने ४९ चेंडूत ५९ धावा केल्या. दरम्यान, इशन किशनने त्याचा झेल घेतला.

अॅडम मिलनेला सिराजने धावचित केले. त्यालाही भोपळा फोडता आला नाही. मिचेल सँटनर ३ चेंडूत १ धावा काढून  सिराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. जेम्स नीशम भोपळा न फोडता मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ऋषभ पंतकडे झेल दिला.

भारताची खराब सुरुवात

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. मिल्नेच्या चेंडूवर इशान किशन झेलबाद झाला. सीमारेषेजवळ चॅपमननं त्यांचा झेल टिपला. इशान किशननं ११ चेंडूत १० धावा केल्या. लगेच तिसऱ्या षटकांत भारताला दुसरा धक्का बसला. साऊदीने पंतची विकेट घेतली. ईश सोधीने पंतचा झेल टिपला. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर साऊदीने भारताला तिसरा धक्का दिला. श्रेयस अय्यरला त्याने धावबाद केले. यामुळे भोपळाही न फोडता श्रेयसला माघारी परतावे लागले.

सूर्यकुमारच्या रूपात चौथा धक्का

भारताला पाठोपाठ तीन धक्के लागल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी सावध खेळी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.  डाव सावरताना हार्दिक सावध खेळी करत होता तर दुसऱ्या बाजून सूर्यकुमार यादव आपल्या नैसर्गिक खेळीने धावफलक खेळता ठेवण्याच्या प्रयत्न करत होता. सामन्याच्या सातव्या  इश सौधीने त्याला फिलिप्सकरवी झेल बाद केले.

तर न्यूझीलंडचा संघ झाला असता विजयी

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर पावसाला पुन्हा सुरूवात झाली. त्यामुळे पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यांनुसार सामना पुन्हा थांबवण्यात आला. न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी भारताने ९ षटकांत ४ गडी गमावून ७५ धावा केल्या होत्या. खेळ थांबला त्यावेळी डीएलएस स्कोअर ७५ धावा होता, त्यामुळे सामना टाय झाला. भारत या धावसंख्येने एक धावही मागे राहिला असता तर न्यूझीलंडला सामन्यात विजयी घोषित केले असते.

पहिल्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय

मालिकेतील पहिल्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता. त्यावेळी नाणेफेकही झाली नव्हती. तर दुसऱ्या सामन्यात भारताने  न्यूझीलंडवर ६५ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादव तुफानी फलंदाजी केली होती.  न्यूझीलंडच्या घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग दुसरा टी-२० मालिका विजय आहे. यापूर्वी २०२० मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडच्या मैदानावर टी-२० मालिकेत त्यांचा ५-0 ने पराभव केला होता.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT