पुणे दुसर्‍या दिवशी गारठलेलेच | पुढारी

पुणे दुसर्‍या दिवशी गारठलेलेच

पुणे, पुढारी वृत्तसेवा: निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानामुळे पुणे, पिंपरी शहरांसह जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी थंडीचा कडाका कायम आहे. या गारठ्यापासून बचाव करण्यासाठी शहर, जिल्ह्यात शेकोट्या पेटल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

सलग दिवशी शहरात किमान तापमानात उणे 5.5 अंश सेस्लियसने घट झाली आहे, तर दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 19 नोव्हेंबर 2012 साली शहराचा किमान तापमानाचा पारा 7.9 अंश सेल्सिअस एवढा नीचांकी होता. 27 नोव्हेंबर 1964 साली किमान तापमानाचा पारा 4.6 अंश सेल्सिअस एवढा घसरला होता. हे ऑल टाइम रेकॉर्ड किमान तापमानाचे आहे. रात्री बाहेर पडताना नागरिक ऊबदार कपड्यांचा वापर करीत आहेत. कोरडे हवामान तसेच निरभ्र आकाश, यामुळे शहरात गारठा वाढला आहे, असे हवामान विभागाचे विभागप्रमुख अनुपम कश्यपि यांनी सांगितले.

रविवारी जिल्ह्यतील बहुतांश गारठलेलेच होते. हवेली तालुक्याचे तापमान हंगामातील सर्वात कमी 8.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. रविवारी पुणे शहरातील शिवाजीनगरचे किमान तापमान 9.7 अंशांवर होते. त्यात दीड अंशाने घट होऊन ते सोमवारी सकाळी 8.8 अंशांवर खाली आले. त्यामुळे दिवसभर नागरिक गरम कपडे घालूनच घराबाहेर पडले. शहरासह तालुक्यांत शेकोट्या पेटताना दिसत आहेत.

सोमवारचे जिल्ह्यातील तापमान

हवेली 8.2, पाषाण 8.2, एनडीए परिसर 8.2, शिवाजीनगर 8.8, माळीण 9.7, तळेगाव 10, बारामती 10.1, नारायणगाव 10.2, आंबेगाव 10.2, दौंड 10.7, निमगिरी 10.9, राजगुरुनगर 10.9, लोणावळा 11.3, ढमढेरे 11.7, हडपसर 11.9, दुदलगाव 11.9, इंदापूर 12.4, शिरुर 12.4, पुरंदर 12.7, भोर 13.5, बालेवाडी 13.7, गिरीवन 14, कोरेगाव पार्क 14.2, खेड 15.1, चिंचवड 15.2, मगरपट्टा 15.5, लवळे 15.6, वडगाव शेरी 17.1

Back to top button