पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा नियमीत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बांगलादेशविरुद्धच्या (ind vs ban 2nd test) दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या अंगठ्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नसून बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन त्याच्या पुनरागमनाची घाई करू इच्छित नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघ केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असल्याचे समजते आहे. दुसरा कसोटी सामना 22 ते 26 डिसेंबर दरम्यान ढाका येथे खेळवला जाईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित 5 पैकी 4 सामने जिंकावे लागणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोहितच्या हाताच्या अंगठ्याला झालेली दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. टीम इंडियाला आगामी काळात काही महत्त्वाच्या मालिका खेळायच्या आहेत, अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संघ व्यवस्थापन रोहितच्या दुखापतीबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. रोहित अजूनही मुंबईत आहे. रोहित फलंदाजी करू शकतो, पण क्षेत्ररक्षणादरम्यान त्याची दुखापत आणखी वाढू शकते. 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी रोहित संघात पुनरागमन करू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी भारतीय कर्णधार पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची बातमी समोर आली होती. त्यावेळी पहिल्या कसोटीच्या तिस-या दिवसाचा खेळ सुरू होता. यादरम्यान, रोहितने त्याच्या फिटनेसबाबत बोर्डाला माहिती दिली असून 17 डिसेंबरला तो बांगला देशला पोहचू शहतो असा दावा करण्यात आला होता.
रोहित शर्माच्या जागी पहिल्या कसोटीत युवा फलंदाज अभिमन्यू ईश्वरनचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र तो पहिल्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग 11 चा भाग बनू शकला नाही. पण दुसऱ्या कसोटीसाठीही रोहितच्या जागी ईश्वरनच खेळण्याची दाट शक्यता आहे.