Jarandeshwar Sugar IT Raids : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या जरंडेश्वर कारखाना भेटीनंतर अवघ्या चोवीस तासांत आयकर पथक जरंडेश्वर कारखान्यावर दाखल झाल्याने कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. जरंडेश्वर कारखान्यावर छापेमारी सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. जरंडेश्वर कारखाना भेटी दरम्यान किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंमत असेल तर कारखान्याचा खरा मालक जाहीर करावा असे ओपन चॅलेंज दिलं होतं.
त्यास २४ तास उलटले नाहीत तोच आयकर विभाग विभागाच्या चार गाड्या कारखान्यांवर तपासणीसाठी आल्याचे वृत्त तालुक्यात सर्वत्र पसरल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी तीन महिन्यांपूर्वी ईडीने महत्वपूर्ण निकाल दिला आणि कारखाना प्रशासनाला नोटीस बजावलेली होती.
कारखान्याची कोट्यवधी रुपयांची जागा आणि इमारत सत्तेच्या जोरावर पवार कम्पुने बळकावली असल्याचा आरोप करीत किरीट सोमय्या यांनी न्यायालयाने दिलेल्या निकालतच घोटाळा सिद्ध झाला असल्याचा आरोप केला. आयकर विभागाच्या वतीने कागदोपत्री कारखाना तीन महिन्यांपूर्वीच सील करण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकर्यांचा उसाचे गाळप करण्यासाठी यापूर्वीच रोलर पूजन करण्यात आले. कारखाना सुरु करण्याच्या हालचाली जलद होत असतानाच काल बुधवार(०६) रोजी किरीट सोमय्या यांनी कारखाना गेटवर येऊन हिंमत असेल तर माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा अन्यथा नोटीस बजावून दाखवाच असे आव्हान दिले होते. त्यामुळे आज आयकर विभागाचे पथक दाखल झाल्याने तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आज काय कारवाई होते यावर लक्ष लागून राहिले आहे.
माझे नातेवाईक असल्याने धाड टाकल्याचे मला वाईट वाटत आहे. माझ्याशी सबंधितांवर छापा टाकला जातो याचा माझ्या नातेवाईकांना त्रास होत आहे. माझ्या नातेवाईकांनी सर्व आयकरचे नियम पाळले. राजकीय हेतुने धाड टाकली की कुठल्या हेतूने धाड टाकली याबाबत आयकर माहिती देईल, असे म्हणाले. मी दर्शनासाठी गेलो होते तेथून येताना छापा टाकल्याचे मला महिती मिळाली, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
माझ्या कोल्हापूर येथील आणि इतर बहिणींच्या घरावर धाडी टाकण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. फक्त नाते असल्याने तीन बहिणींवर कारवाई केली जात असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. खालच्या पातळीचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राज्यातील विविध ठिकाणी आयकर विभागाकडून छापे आजसकाळ पासून टाकण्यात येत आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या नातेवाईकांवर छापा टाकल्यामुळे अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.