पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आणि राजकीय वर्तुळात एकच भूकंप आला. आज (दि. २) पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी पवारांच्या या पुस्तकातील काही महत्त्वाच्या गोष्टींवर लोकांचे लक्ष वेधले जात आहे. यामधीलच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'अजित पवारांनी उचललेले पाऊल चुकीचे' हा होय. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मुद्यांवर या पुस्तकात चर्चा करण्यात आला आहे. (sharad pawar news)
अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे यासंदर्भात शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात बरीच माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या या निर्णयाची माहिती खुद्द शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करुन दिली होती. याचा खुलासाही शरद पवारांनी या पुस्तकातून केला आहे. अजितची कृती म्हणजे पक्षशिस्तीचा भंग होता, असेही पवारांनी पुढे म्हटले आहे.
संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला. राजकारणातल्या अतर्कतेचा आणखी एक अनुभव गाठीशी जमा झाला, असेही शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे.
मोदी राजवटीबद्दल माझं एक निरीक्षण असेही आहे की, मोदी माध्यमंशी फटकून राहतात हे अनाकलनीय आहेच; पण सकाळी ५ वाजता उठून दिवसभर कितीही तास काम करण्याची त्यांची तयारी वाखाणण्याजोगी आहे, अशा शब्दांत पवारांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. ही स्तुतीसुमने उधळत असतना अनेक टीकाही त्यांच्या पुस्तकात दिसून येतात. संसद भवनातील सेंन्ट्रल हॉलमध्ये पत्रकारांसाहित विरोधी-सत्तेतील सर्व नेते दिलखुलास चर्चा करायचे ते आता दिसत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केल्याचे दिसते. (sharad pawar news)
पुस्तकामध्ये, २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपने त्याधीच्या सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना नेमकेपणाने हेरून अत्यंत आक्रमक प्रचार यंत्रांना राबवली. यामध्ये मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करून कशाप्रकारे विजय मिळवला याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले आहे. महाविकास आघाडीचे सरकार हा फक्त सत्तेचा खेळ नव्हता तर ते भाजपच्या वृत्तीला सडेतोड उत्तर होत. या पुस्तकातील राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींची मांडणी आणि विश्लेषण वाचताना एकांगीपणा दिसून येत नाही.
हेही वाचा :