शरद पवारांच्‍या निवृत्तीच्‍या घोषणेनंतर संजय राऊत यांचं सूचक टि्वट, “बाळासाहेब ठाकरे यांनी…” | पुढारी

शरद पवारांच्‍या निवृत्तीच्‍या घोषणेनंतर संजय राऊत यांचं सूचक टि्वट, "बाळासाहेब ठाकरे यांनी..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली. त्‍यांच्‍या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या घोषणेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक टि्वट करत आपली भूमिका मांडली आहे.

“बाळासाहेब ठाकरे यांनी…”

संजय राऊत यांनी आपल्‍या टि्वटमध्‍ये म्‍हटले आहे की, “एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत.”

शरद पवारांनी केली निवृत्तीची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होण्याबाबतचा निर्णय आज घेतला आहे, अशी घोषणा करत राष्ट्रवादीचा (NCP) नवा अध्यक्ष कोण असेल, हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ठरवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Resigns) यांनी आज (दि. २) केले.

यावेळी पवार (Sharad Pawar Resigns) म्हणाले की, आज सकाळीच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेली ६० वर्षांहून अधिक काळ मी राजकारण आणि समाजकारणात मी सक्रिय आहे. यापुढेही मी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणार आहे, असेही ते म्हणाले.

कार्यकर्त्यांचा सभागृहातच निर्णयाला विरोध

शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहातच कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी मागणी करत त्यांनी पवारांच्या निवृत्तीला तीव्र विरोध केला. व्यासपीठावर धाव घेत पवारांना गराडा घातला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी अजित पवारांनी व्यासपीठ सोडण्याचे आवाहन केले. मात्र, कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण झाले.

अजित पवार, जयंत पाटील यांची शरद पवारांशी चर्चा

शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी, या मागणीवर कार्यकर्ते ठाम राहिले. अजित पवार, जयंत पाटील यांनी शरद पवारांशी चर्चा केली. यानंतर अजित पवार म्हणाले की, याबाबत एक समिती स्थापन केली जाईल, यामध्ये पक्षाती ज्येष्ठ नेते असतील.या समितीचा निर्णय शरद पवारांना मान्य असेल, असे स्पष्ट करत सर्वांनी शांत राहावे. तर बैठकीत सर्वच ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. त्यामुळे शरद पवारांनी आताच निर्णय जाहीर करावा,अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तसेच जोपर्यंत निर्णय होत नाही, आम्ही येथून हालणार नाही, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.

जयंत पाटील यांना अश्रू अनावर

शरद पवार बाजूला गेले, तर आम्ही कोणाला घेऊन मतदारांसमोर जाणार, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या नावाने ओळखला जातो. त्यांना निवृत्त स्वीकारण्याचा अधिकार नाही. त्यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती जयंत पाटील यांनी केले. यावेळी ते भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. तुम्ही थांबणार असेल. तर आम्हीही थांबतो, असा निर्वाणीचा इशाराही पाटील यांनी दिला. यावेळी भावूक झालेल्या जयंत पाटील यांनी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना धीर दिला.

 

 

Back to top button