राशिवडे;पुढारी वृतसेवा : नंदवाळ (ता. करवीर) येथील परिसरात बुधवारी (दि.१४) सकाळी बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याने, भितीचे वातावरण पसरले होते. मात्र तेथील पायांच्या ठशांवरुन तो प्राणी बिबट्या नसून, तरस असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी वैरणीसाठी गेलेल्या येथील शेतकऱ्यांना व जनावरे चारण्यासाठी गेलेल्या लोकांना जगताप मळा परिसरात बिबट्या सदृश्य हा प्राणी नजरेस पडला होता. परंतु हा बिबट्या नसून, तरस असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता भिती बाळगण्याचे काही कारण नसल्याचे, वन खात्याने म्हटले आहे.
कोल्हापूर ते भोगावती मार्गावरील वाशी व नंदवाळच्या मध्यभागी हा मळा आहे. नंदवाळ ग्रामस्थांकडून माहिती मिळताच वनखात्याचे पथक तपासासाठी दाखल झाले. दरम्यान तेथील परिसरात वनखात्याच्या रेस्क्यू पथकाला मिळालेल्या पायांच्या ठशांवरुन तो प्राणी बिबट्या नसून, तरस असल्याचे दुपारी स्पष्ट झाले. त्यामुळे शेतकरी व जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या लोकांनी घाबरण्याचे काही कारण नाही, असे वनखात्याने म्हटले आहे. करवीर वनक्षेत्रपाल विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राहूल झोनवाल व रेस्क्यू पथकातील सहकाऱ्यांनी परिसरात फिरून पाहणी करून हा निष्कर्ष काढला आहे.