कोल्हापूर नवरात्रौत्सव : अंबाबाई दर्शनासाठी 200 रुपयांचा ई-पास | पुढारी

कोल्हापूर नवरात्रौत्सव : अंबाबाई दर्शनासाठी 200 रुपयांचा ई-पास

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : नवरात्रौत्सवासाठी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून ‘पेड ई-पास’ ची सुविधा उपलब्ध केली आहे. पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत दर तासाला 200 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते.

पेड ई-पासधारकांसाठी स्वतंत्र दर्शन मार्गाची व्यवस्था करण्यात आली असून तासाला 1 हजार ई-पास देण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

शारदीय नवरात्रौत्सवात देशभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. गेली दोन वर्षे ई-पास प्रणालीच्या माध्यमातून अंबाबाई मंदिरात दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. सोपी ऑनलाईन नोंदणी आणि वेळेत दर्शन यामुळे नवरात्रौत्सवातदेखील अशा प्रकरची सुविधा देवस्थान समितीकडून उपलब्ध केली जावी, अशी मागणी परराज्यातून येणार्‍या भाविकांकडून केली जात होती. ज्या भाविकांना वेळेची मर्यादा आहे, अशा भाविकांसाठी ही पेड ई-पास प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. यामुळे भाविकांना ऑनलाईन नोंदणी करून दर्शन घेणे सोपे होणार आहे.

व्हीआयपी दर्शनाचा ससेमिरा टाळला जाणार

नवरात्रौत्सवात व्हीआयपी दर्शनाची मागणी हजारोंकडून केली जाते. सुमारे 10 हजार व्हीआयपी दर्शन पास रोज दिले जात होते. आता व्हीआयपी दर्शनदेखील या पेड ई – पासच्या माध्यमातून दिले जाणार आहे. यामुळे देवस्थानच्या तिजोरीत भर पडणार आहे, तसेच व्हीआयपी दर्शनाचा ससेमिरादेखील टाळला जाणार आहे.

असा आहे पासधारकांसाठी दर्शन मार्ग

पेड ई – पास घेतलेल्या नागरिकांना तसेच इतर भाविकांनादेखील गाडगे महाराज पुतळ्याजवळील पूर्व दरवाजातून आत सोडले जाईल. त्यानंतर पासधारक भाविकांना सटवाई मंदिराकडून दर्शन रांगेकडे सोडले जाईल. इतर भाविकांसाठी दर्शनाचे पूर्वीचे सर्व मार्ग खुले असणार आहेत.

Back to top button