कोल्हापूर जिल्ह्यात लम्पिस्किनचा धोका वाढतोय | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात लम्पिस्किनचा धोका वाढतोय

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात लम्पिस्किन आजाराचा धोका वाढतच आहे. अतिग्रे नंतर कबनूर, रांगोळी येथील गायींनाही लम्पिस्किनची लागण झाली आहे. मंगळवारअखेर लम्पिस्किन झालेल्या गाय व बैलांची संख्या 42 वर गेली आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला असून बुधवारी (दि. 14) जिल्ह्याला 50 हजार डोस उपलब्ध होणार आहेत.

महाराष्ट्रात प्रथम गडचिरोली येथे लम्पिस्किन आजाराची गाय आढळून आली. कोल्हापुरात दि. 28 ऑगस्ट रोजी अतिग्रे येथील चौगुले वस्तीमध्ये पहिली लम्पिस्किन झालेली गाय आढळून आली. गुजरातवरून एक गाय आणण्यात आली होती. परंतु चौगुले यांनी लगेच ती विकली. परंतु त्या गायीमुळे गोठ्यातील अन्य गायींना या आजाराची लागण झाली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने पाहणी केल्यानंतर या परिसरातील 14 गायी व 3 बैलांना लम्पिस्किन झाल्याचे आढळून आले. त्यानंतर लसीकरण सुरू करण्यात आले.

त्यानंतर या साथीची लागण आजूबाजूच्या गावांना होऊ लागली. दि. 5 सप्टेंबर रोजी कबनूर येथे 5 गायी व 3 बैलांना लम्पिस्किनची लागण झाल्याचे आढळून आले. लसीकरण सुरू करण्यात आले असले तरी हा आजार आटोक्यात येण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून आले. दि. 9 सप्टेंबर रोजी रांगोळी येथे 17 गायी आढळल्या. त्यामुळे लम्पिस्किनची लागण झालेल्या गाय व बैल मिळून संख्या 42 वर गेली आहे.

दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाचा वेग वाढविला आहे. लम्पिस्किन आढळलेल्या गावापासून पाच किलोमीटर हद्दीतील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाकडून बुधवारी 50 हजार डोस उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पोवार यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकार्‍यांना गावामध्ये सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लम्पिस्किन आजाराची लक्षणे आढळल्यास शेतकर्‍यांनी तत्काळ पशुसंवर्धन अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांना माहिती देण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

Back to top button