गुडाळ: कोल्हापूर जिल्हा आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणीची आढावा बैठक आज (दि.१) सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मार्केट यार्ड परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात होत आहे. दरम्यान, बिद्रीच्या निवडणुकीपासून गेले एक महिना राष्ट्रवादी काँग्रेस आणि ना. मुश्रीफ यांच्यापासून दुरावा ठेवून असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या बैठकीमध्ये सहभागी होणार की बैठकीला दांडी मारणार? याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (A.Y. Patil)
बिद्री साखर कारखान्याची निवडणूक माजी आमदार के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील या मेव्हण्या- पाहुण्यांच्या उघड संघर्षामुळे पश्चिम महाराष्ट्रात लक्षवेधी ठरली होती. या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा मंत्री मुश्रीफ यांच्यावर थेट टीका करत ए. वाय. यांनी मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक समरजीतसिंह घाटगे यांच्याशी हात मिळवणी केली होती. त्यामुळे मुश्रीफ आणि ए. वाय यांच्यातही दुरावा निर्माण झाला. (A.Y. Patil)
गेले महिनाभर राष्ट्रवादीपासून अलिप्त असलेल्या ए. वाय यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि समरजीतसिंह घाटगे यांच्या समवेत भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाची तयारी केल्याचे बोलले जात होते. ही चर्चा सुरू झाल्यानंतर राधानगरीतील ए. वाय. यांच्या बहुतांश समर्थकांनी त्यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्री मुश्रीफ यांनी बिद्री निवडणुकीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सहकारातील निवडणूक पक्षीय नसते, असे सांगत ए. वाय. यांची नाराजी दूर करण्याचे संकेत दिले होते.
या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या प्रारंभीच राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आज होत आहे. या बैठकीतील हजेरी – गैरहजेरीवर ए. वाय यांच्या वाटचालीची दिशा स्पष्ट होणार असल्यामुळे या बैठकीबद्दल राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. साहजिकच जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीतील या बैठकीला हजर राहणार की दांडी मारणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा