Kolhapur Politics : ए. वाय. पाटील भाजपच्या वाटेवर? | पुढारी

Kolhapur Politics : ए. वाय. पाटील भाजपच्या वाटेवर?

आशिष ल. पाटील

गुडाळ : गेले वर्षभर राष्ट्रवादीमध्ये घुसमट अनुभवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील ‘बिद्री’ साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते ना. हसन मुश्रीफ यांच्या थेट विरोधात गेल्यानंतर त्यांच्यातील दरी आणखी रुंदावली आहे. परिणामी, पाटील हे राष्ट्रवादीचे घड्याळ हातातून काढून भाजपचे कमळ हाती घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांत याबाबत वेगवान घडामोडी घडल्या असून, भाजपचे जिल्ह्यातील नेते समरजित घाटगे यांच्यासह ए. वाय. पाटील हे कोल्हापूरमधून व्हाया मुंबई, नागपूरमध्ये मंगळवारी दाखल झाले. बुधवारी सकाळी घाटगे व पाटील यांनी ना. चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

‘बिद्री’तील परिवर्तन आघाडीच्या पराभवानंतर 9 डिसेंबर रोजी सोळांकुर येथे कार्यकर्त्यांच्या आभार मेळाव्यात ए. वाय. पाटील यांनी पक्षात आपले खच्चीकरण होत असल्याचा आणि जिल्हा तसेच राज्य नेतृत्वाकडे दाद मागूनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. या मेळाव्यात बहुतांश कार्यकर्त्यांनी शिवसेना किंवा भाजपमध्ये न जाता, आ. पी. एन. पाटील किंवा आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, काँग्रेस राज्यात किंवा देशात सत्तेवर नसल्याने पाटील यांनी भाजपला प्राधान्य दिले असल्याचे बोलले जात आहे.

मी योग्यवेळी माझी भूमिका स्पष्ट करेन : ए. वाय. पाटील

‘बिद्री’मध्ये ए. वाय. यांना परिवर्तन आघाडीत आणण्यासाठी ना. चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले होते. आता पडत्या काळात त्यांचे उत्तरदायित्व स्वीकारण्याची जबाबदारी ना. पाटील यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपकडे ए. वाय. पाटील यांनी विधान परिषदेला संधी मिळावी, अशी मागणी केली असून भाजप त्यांना विधानपरिषद देणार की महामंडळ देणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. विधान परिषदेवर संधी मिळत असेल तरच भाजपचा पर्याय स्वीकारावा, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. यासंदर्भात ए. वाय. पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ‘मी योग्यवेळी माझी भूमिका स्पष्ट करेन,’ असे सांगून अधिक माहिती देण्याचे त्यांनी टाळले.

Kolhapur Politics :  करेक्ट कार्यक्रम होईल म्हणून…

‘बिद्री’च्या निवडणुकीत एका प्रचार सभेत बोलताना ए. वाय. पाटील यांनी मी ना. मुश्रीफ आणि के. पी. पाटील यांच्यातून बाहेर पडलो ते बरे झाले; अन्यथा या दोघांनी आत घेऊन माझा करेक्ट कार्यक्रम केला असता, असा हल्लाबोल केला होता. आता एकदा विरोधात जाऊन थेट आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर पुन्हा पक्षात राहिलो तर करेक्ट कार्यक्रमाची भीती खरी होईल, अशी खात्री झाल्यानेच तेे घड्याळापासून दूर जात असल्याची चर्चा आहे.

Back to top button