इस्लामाबद; वृत्तसंस्था : भ्रष्टाचारप्रकरणी गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भर चौकात फाशी द्यायला हवी, असे विधान पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ अहमद खान यांनी केले आहे. त्याचवेळी सध्याची परिस्थिती अशीच गंभीर राहिली, तर पाकिस्तानचे आणखी तुकडे पडतील, असा इशारा इम्रान खान यांनी दिला आहे. (Imran Khan)
भ्रष्टाचारविरोधी संस्थेने त्यांना मोकळे सोडल्याबद्दल राजा खान यांनी न्यायालयावर टीका केली आहे. ते म्हणाले, इम्रान खान यांना जाहीर फाशी द्यायला हवी होती. दुर्दैवाने न्यायालये त्यांचे जावई असल्यासारखे स्वागत करत आहेत. जर न्यायाधीश इम्रान खान यांच्यावर एवढे मेहेरबान असतील, तर त्यांनी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षामध्ये सामील व्हावे. त्या पक्षात काही जागा रिक्त आहेत. पुढे जाऊन त्यांनी पीटीआयच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, असेही त्यांनी सांगितले. खान यांना सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाने आणि नंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. (Imran Khan)
दरम्यान, सुरक्षा दलांनी इम्रान यांच्या घराला चहूबाजूंनी वेढल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. 9 मे रोजी इम्रान समर्थकांनी देशभर उग्र निदर्शने केली होती. तेव्हापासून पाकिस्तानात अराजकासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी आरोप केला आहे की, 'पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ'च्या प्रमुखांनीच कट रचून सैन्यांच्या ठिकाणांवर हल्ले करणार्या दंगलखोरांना प्रशिक्षण दिले होते.
इम्रान खान यांनी, सत्ताधारी आघाडीने लष्कराला हाताशी धरून, माझा पक्ष फोडण्याची तयारी सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सध्याची राजकीय अस्थिरता संपवण्याचा एकमेव उपाय म्हणजे निवडणुका घेणे, असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेतही पाकिस्तानमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. तेथील 65 सिनेटर्सनी परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून आपल्या तीव्र भावना कळविल्या आहेत.
इम्रान लंडनला जाण्याच्या तयारीत
इम्रान खान यांच्यावर आर्मी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे आता त्यांना शिक्षा तरी भोगावी लागेल किंवा विदेशात पळून जावे लागेल.
यातील दुसर्या पर्यायावर इम्रान खान विचार करीत असल्याचे वृत्त आहे. म्हणजेच ते लंडनला पळून जाऊ शकतात. तसेही पाकिस्तानच्या नेत्यांचे लंडनप्रेम जुनेच आहे. यापूर्वी बेनझीर भुट्टो, माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ, नवाझ शरीफ आदींनी लंडनमध्ये आश्रय घेतला होता. त्यामुळे शिक्षेच्या जोखडातून आपली मान सोडवून घेण्यासाठी लष्कराच्या सहमतीने इम्रान खान लंडनला जाऊ शकतात. याचे आणखी एक कारण म्हणजे लंडनमध्ये निर्वासितांना कायद्याने संरक्षण दिले जाते.
अधिक वाचा :