डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, तपास बंद करण्याच्या भूमिकेविषयी उत्तर सादर करण्याचे निर्देश | पुढारी

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, तपास बंद करण्याच्या भूमिकेविषयी उत्तर सादर करण्याचे निर्देश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास बंद करण्याचा केंद्रीय गुन्हे अन्वेषण च्या (सीबीआय) निर्णयाविरोधात गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. सीबीआयच्या निर्णयाला मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. संजय किशन कौल आणि न्या. अहसुद्दिन अमनउल्लाह यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेत सीबीआयला नोटीस बजावत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.

डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या एका व्यापक कटाचा भाग असल्याचे अनेक पुरावे समोर आल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या हत्यांमागचा सूत्रधार फरार असेपर्यंत विवेकवादी विचारवंतांच्या जीवाला असलेला धोका कायम आहे, अशी बाजू याचिकेतून मांडण्यात आली आहे. दरम्यान सुनावणी दरम्यान न्यायालयाने सीबीआयला त्याच्या तपास बंद करण्याच्या भूमिकेविषयी नोटीस बजावली आहे.

Back to top button