Trimbakeshwar Controversy : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी एस आय टी चौकशी मागे घ्यावी; ग्रामस्थांची मागणी | पुढारी

Trimbakeshwar Controversy : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी एस आय टी चौकशी मागे घ्यावी; ग्रामस्थांची मागणी

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर डोके ठेवून धूप दाखविण्याची शंभर वर्षाची परंपरा असून कुणीही मुस्लिम मंदिरात घुसलेले नाही. मंदिरातील नवीन सुरक्षा रक्षकांना ही माहिती नसल्याने त्यांनी आमच्याच गावातील त्या चार जणांना अडवले आणि वातावरण बिघडले. वास्तविक सलीम सय्यद आणि अन्य तीन जण हे गावातील असून त्यांच्या पिढ्यान् पिढ्या असे करत आले असून ते कधीच मंदिरात गेले नसून त्यांच्या टपऱ्या मंदिर परिसरात आहेत. त्यामुळे राजकारण न करता एस आय टी चौकशीची गरज नाही अशी मागणी त्र्यंबकेश्वर मधील माजी नगराध्यक्षासह ग्रामस्थांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन केली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

मुस्लिम हे मंदिर ताब्यात घेणार आहेत, अशी खोटी माहिती पसरवून मंदिर आणि गावाला बदनाम केले जात आहे. त्यामुळे भाविक येणे कमी झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकतर्फी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी एस आय टी चौकशी लावली, ती मागे घ्यावी लागेल, गावातील शांतता समितीची बैठक झाली. सलीम सय्यद यांच्या पाठीशी संपूर्ण गाव उभे आहे, असे त्र्यंबकेश्वर मधील नागरिकांनी स्पष्ट केले.

Back to top button