पुढारी ऑनलाईन डेस्क : एकनाथ शिंदे यांनी माझ्या कानात सांगितले असते, तर आम्हीच उद्धव ठाकरे यांना सांगून तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवले असते, अशा शब्दात आज राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाेरदार फटकेबाजी केली. आजपासून (दि.३) विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होऊन ॲड. राहुल नार्वेकर यांची १६४ मतांनी निवड झाली. नार्वेकर यांच्या अभिनंदन ठरावावर अजित पवार बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, "राहुल नार्वेकर आधी शिवसेनेत होते. त्यावेळी ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती होते. नंतर त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवली. नरेंद्र मोदी यांची लाट होती. अनेक दिग्गजांचा पराभव झाला.
यामध्ये त्यांचाही समावेश होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवले येथेही त्यांनी उत्तम काम केले. यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि कुलाबा मतदारसंघातून आमदार झाले. राहुल नार्वेकर यांचे वैशिष्ट म्हणजे, ते ज्या पक्षात जातात तेथील पक्षश्रेष्ठींचे ते निकटवर्ती होतात. आता ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. भाजपच्या वरिष्ठ त्यांना जे जमले नाही ते राहुल नार्वेकरांनी तीन वर्षांत करुन दाखवले आहे, अशी फटकेबाजीही अजित पवार यांनी केली.
राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबीयाला राजकीय सामाजिक पार्श्वभूमीवर आहे. त्यामुळे ते सभागृहाला न्याय देतील. सभागृहाला न्याय देण्याबरोबरच सर्वांना न्याय मिळेल, याकडे ही त्यांचे लक्ष असेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो . नार्वेकर अभ्यासू, मेहनती असून त्यांचे मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. त्यांनी आमदार म्हणून चांगले काम केले आहे. याचा फायदा सभागृहाचे कामकाज चालविताना त्यांना होईल.नार्वेकर सर्वांत तरुण सभागृह अध्यक्ष झाले आहेत. त्यांना हा जेवढा मान मिळाला आहे. तेवढीच त्यांना मोठी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे, असेही पवार म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी राज्य सरकारच्या वतीने ॲड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत नार्वेकर बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांना १६४ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ मते मिळाली.
हेही वाचलंत का ?