‘पुढारी आरोग्य संवाद’: 'आयुर्वेद आणि जीवन' या विषयावर डॉ. परिक्षित शेवडे यांचे आज व्याख्यान | पुढारी

‘पुढारी आरोग्य संवाद’: 'आयुर्वेद आणि जीवन' या विषयावर डॉ. परिक्षित शेवडे यांचे आज व्याख्यान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: दै. ‘पुढारी’च्या वतीने ‘डॉक्टर्स डे’निमित्त आयोजित ‘पुढारी आरोग्य संवाद’ या मालिकेत आज ‘आयुर्वेद आणि जीवन’ या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. परिक्षित शेवडे यांचे व्याख्यान होणार आहे. ‘पुढारी ऑनलाईनवर’ आज सायंकाळी ६ वाजता हा संवाद होणार आहे.

‘पुढारी’ समूहातर्फे दि. २ ते ४ जुलै दरम्यान ‘आरोग्य संवाद’अंतर्गत ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. हृदयविकार, कर्करोग हे आजार, उपचार तसेच हे आजार उद्भवू नयेत म्हणून अंगीकारण्याची आयुर्वेदिक जीवनशैली, याबाबतचे त्रिसूत्री मार्गदर्शन या तीन दिवसीय व्याख्यानमालेतून उपलब्ध होणार आहे. जागतिक स्तरावर कीर्ती मिळविलेल्या डॉक्टरांचा सहभाग, हे ‘पुढारी आरोग्य संवाद’ या व्याख्यानमालेचे खास वैशिष्ट्य आहे.

कोरोना व कोरोनानंतरच्या काळात आरोग्य हा सर्वाधिक कळीचा मुद्दा बनलेला आहे. काळाची गरज लक्षात घेऊन ‘पुढारी’ने दरवर्षी ‘डॉक्टर डे’चे औचित्य साधून ‘आरोग्य संवाद’ या ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन सुरू केले. कोरोना काळात खास सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत सलग तीन दिवस व्याख्यान असेल. डॉ. संदीप पाटील हे या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन करतील.

आरोग्यमय जीवन जगण्याच्या दृष्टीने व्याख्याने अत्यंत उपयुक्‍त व दिशादर्शक ठरणार आहेत. नागरिकांनी ही व्याख्याने पाहावीत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. व्याख्याने पाहण्यासाठी Pudharionline या फेसबुक पेजला लाईक करून सहभागी व्हा.

 

Back to top button