Maharashtra Assembly Speaker Poll : बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या सैनिकावर ५० आमदरांनी विश्वास ठेवला : एकनाथ शिंदे | पुढारी

Maharashtra Assembly Speaker Poll : बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या सैनिकावर ५० आमदरांनी विश्वास ठेवला : एकनाथ शिंदे

मुंबई, पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्ष दररोज नवनवी वळणे घेताना दिसत आहे. शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांचे सरकार आज विधासभेत पहिल्या अग्निपरीक्षेला सामोरे गेले. आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी राज्य सरकारच्या वतीने ॲड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत नार्वेकर बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांना १६४ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. बविआ आणि मनसेने राहुल नार्वेकरांच्या बाजूने मतदान केले. तर समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर बहुमतांनी विजयी झाले. आता अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार असेल. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी पार पडणार आहे. (Maharashtra Assembly Speaker Poll)

महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस

आज महाराष्ट्राने नवा रेकॉर्ड केला आहे. राहुल नार्वेकर महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. हे कायदेमंडळ असून वेगवेगळे कायदे करतो. प्रत्येकाचा विचार, आशा, अपेक्षा या सभागृहात सदस्यांच्या माध्यमातून मांडल्या जातात. त्या सोडवण्याची क्षमता या सभागृहात आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

झुकतं माप द्यावं अशी इच्छा नाही : एकनाथ शिंदे

न्यायदान करताना कायद्यापुढे सर्व समान याप्रणामेच निर्णय होतील अशी आशा आहे. आम्ही सत्ताधारी बाकावर असलो तरी झुकतं माप द्यावं अशी इच्छा नाही. पारदर्शक पद्धतीने आम्हाला कारभार चालवायचा आहे. आपण मार्गदर्शनदेखील करावं अशी आशा आहे. तरुण आमदारांच्या चिंता दूर करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या सैनिकावर ५० आमदरांनी विश्वास ठेवला : एकनाथ शिंदे

राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झालं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार, भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आतापर्यंत ज्या घटना घडल्या त्याची देशाने नोंद घेतली आहे. मी नगरविकास मंत्री होतो आणि माझ्यासोबत ८ मंत्री पायउतार झाले. एकीकडे सत्ता, मोठे नेते आणि दुसरीकडे बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा सैनिक होता. पण ५० विधानसभा सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला हे आमचे भाग्य आहे. एका आमदाराला मी स्वत: चार्टर्ड विमानाने पाठवलं. त्यामुळे कोणावरही जबरदस्ती झालेली नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदनाचा प्रस्ताव

विधानभवन लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. अध्यक्षांची उच्च परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अनेकांना यानंतर मोठी संधी प्राप्त झाली आहे. देशपातळीवरही त्यांना गौरवण्यात आलं आहे. सर्वोच्च पदावर विराजमान होत असताना फक्त राज्यातील नव्हे तर देशातील आणि परदेशातील लोक हा ऐतिहासिक क्षण डोळे भरुन अनुभवत आहेत. कालपर्यंत आपण कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होतात. पण आता व्यक्तिमत्वाला या न्यायालयातील शिरपेच मिळाला आहे. या पदाचा, मान, सन्मान, दर्जा मोठा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

विधानसभेत निवडणुकीला सुरुवात

विधानसभेत निवडणुकीला सुरुवात झाली आहे. राहुल नार्वेकर आणि राजन साळवींच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर राजन साळवींसाठी थोपटेंनी प्रस्ताव मांडला.

आवाजी मतदानानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. सभागृहात प्रत्यक्ष मतमोजणी सुरु असताना काही सदस्य गोंधळ घालत आहेत. काही सदस्य आसन क्रमांक सांगत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. यावर जयंत पाटील यांनीदेखील उभं राहून प्रक्रिया व्यवस्थित राबवण्याची विनंती केली.

शिवसेना विधानभवन कार्यालय आम्हीच सील केलं – आदित्य ठाकरे

विधानभवनातील शिवसेना विधानभवन कार्यालय आम्हीच सील केलं आहे. त्याची चावी आमच्याकडेच आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कसाबच्या वेळीदेखील इतका बंदोबस्त लावण्यात आला नव्हता. बसमधून आणलेल्या आमदारांचं मला वाईट वाटतं, कसाबलाही असं आणलं नसेल. कोणी पळणार आहे का? अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी करत शिंदे गट आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. व्हीपवरून प्रश्न केला असता त्यांनी शिवसेनेचा व्हीप अधिकृत आहे असल्याचा दावा केला.

आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हाला धोका दिला ठीक आहे, पण मुंबईकरांना धोका देऊ नका असेही आवाहन त्यांनी आरे कारशेडचा उल्लेख करत एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांना टोला लगावला.

काँग्रेस नेते नाना पटोलेंची भाजपवर टीका

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार यांनी आमच्यामागे महाशक्ती असल्याचं सांगितलं आहे. राज्यपालांवर आम्ही जो संशय व्यक्त केली होता तो खरा ठरला आहे. आम्ही निवडणूक मागत असताना न्यायव्यवस्थेत असल्याने कारवाई करता येणार नाही सांगत होते. राज्यपालांनी निवडणूक लावली आहे त्यावरुन कोणती महाशक्ती आहे हे समजत आहे. हुकूशमाही आणि दडपशाही सुरु असून त्याचा वापर विधानसभेत होऊ नये अशी आग्रही विनंती आहे. अन्यथा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासला जाऊ शकतो असं आमचं म्हणणं आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनात दाखल झाले आहेत.

भाजपाचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार राहुल नार्वेकर विधानभवनात दाखल

भाजपाचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार राहुल नार्वेकर विधानभवनात पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी हाताने व्हिक्ट्री हे चिन्ह दाखवत आपणच विजयी होऊ अशा खात्री दर्शवली. राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. राहुल नार्वेकर विजयी झाल्यास सासरे आणि जावई यांची जोडी महाराष्ट्राच्या विधी मंडळावर पाहायाला मिळू शकते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांनी कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे. शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले. यावेळी भाजपा नेते प्रसाद लाडही उपस्थित होते.

विधानसभेतील शिवसेनेचे कार्यालय सील

विधानसभेतील शिवनेसेचे कार्यालय सील करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष शिगेला पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी आमने- सामने 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी आमने- सामने आहेत. अध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना आणि शिंदे गटाने पक्षादेश (व्हीप) जारी केले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीवेळी कोणाचा व्हीप ग्राह्य धरला जाणार यावरून सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Speaker Poll)

शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना सभागृहात उपस्थित राहून राजन साळवी यांनाच मतदान करावे,असा व्हीप जारी केला आहे. तर बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते भरत गोगावले यांनीही व्हीप बजावला असून या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याने आमचाच व्हीप लागू असेल, असा दावा केला आहे. 16 आमदारांनी आमच्या व्हीपचे पालन केले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. (Maharashtra Assembly Speaker Poll)

विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला परवानगी दिली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने राज्यपालांनी आघाडी सरकारला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यास परवानगी नाकारली होती. मात्र नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे सरकारला अध्यक्ष निवडणूक घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना निवडणुकीला परवानगी कशी? या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ होऊ शकतो. (Maharashtra Assembly Speaker Poll)

विधानसभेच्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनासाठी विधान भवनात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस फौजफाट्यामुळे विधान भवनाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. विधान भवनाच्या चारही बाजूला पोलिसांचे कडे उभारण्यात आले आहे. आमदारांशिवाय इतर कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही.

विधान मंडळ सचिवालयाने शनिवारी चार पानी पत्रक प्रसिद्ध केले. यात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विधान भवनाच्या आवारात अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तींच्याच वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. आमदारांचे स्वीय सहायक आणि अंगरक्षकांना विधान भवनात प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यासाठी विधान भवनाच्या कार पार्किंगमध्ये उभारण्यात आलेल्या मंडपात व्यवस्था करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळपासूनच विधान भवनाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या परिसराच्या चारही बाजूला पोलिस तैनात केले आहेत. रविवारी आणि सोमवारी सर्व प्रवेशद्वारांवर मुंबई पोलिसांचे कमांडो तैनात करण्यात येतील. बंडखोर आमदारांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएफएस) संरक्षण आहे. मात्र, सीआयएफएसच्या जवानांनाही विधान भवनात प्रवेश दिला जाणार नाही. (Maharashtra Assembly Speaker Poll)

Back to top button