विटा; पुढारी वृत्तसेवा : बिहारमधून विट्यात आलेल्या परप्रांतीय जोडप्यात तुफान वादावादी झाली. यातून पतीने आज (गुरुवार) सकाळी साडेसात वाजता पत्नीचा खून केल्याची घटना घडली. पतीकडून पत्नीचा खून झाल्याच्या घटनेची विटा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पती नरेश साह याला ताब्यात घेण्यात आले आहे. लीलावती नरेश साह (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. पतीकडून पत्नीचा खून झाल्याची घटना परीसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काल (बुधवार) दुपारी बिहारमधील गोपाल गंज शहरातून नरेंद्र साह आणि लीलावती साह हे पती-पत्नी विटामध्ये मोलमजुरी करण्यासाठी आले.
येथील कराड रस्त्यालगतच्या एका हॉटेलच्या पाठीमागे हे परप्रांतीय जोडपे काल राहिले होते. रात्रीपासूनच या दोघांमध्ये काही कारणावरून वादावादी झाली. मात्र सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान पती नरेन याने पत्नी लीलावती हिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला.
याबाबत माहिती मिळताच विटा उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम आणि पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी तात्काळ भेट दिली. दरम्यान, संशयित पती नरेन साह याला पोलिसांनी अटक केली आहे.