Latest

सदाभाऊ खोत यांची हॅाटेलमध्ये उधारी; वसुलीसाठी मालकाने अडवला ताफा

backup backup

सांगोला; पुढारी वृत्तसेवा : गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील ६६ हजार ४६० रुपये उधारीच्या पैशासाठी हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना सांगोला पंचायत समितीच्या आवारात अडवून जाब विचारला. ते कारमधून खाली उतरताच भाऊ आपला पैशाचा विषय मिटवा म्हणत अडवले. यावेळी अचानक घडलेल्या प्रकारामुळे यावेळी गोंधळ उडाला. यावेळी सदाभाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सारवासारव करीत असतील पैसे तर देऊन टाकू असे म्हणून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो हॅाटेल मालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले.

भाऊ माझ्या हॉटेलच्या बिलाचा विषय मिटवा

पंचायत राज्य समितीच्या सांगोला दौऱ्यात काल बुधवारी माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांचे सांगोला पंचायत समितीच्या आवारात आगमन होताच ते कारमधून खाली उतरले. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या गर्दीतून अचानक मांजरी ता. सांगोला येथील हॅाटेल मालक अशोक शिनगारे यांनी त्यांना आडवले. भाऊ माझे सन २०१४ मधील हॉटेलच्या बिलाचा विषय मिटवा असे म्हणून त्यांना रोखले. अचानक या प्रकारामुळे सर्वांचे लक्ष त्या दोघांच्या चर्चेकडे वळले.

यावेळी शिनगारे यांनी या बिलासाठी मी ८ वर्षे वाट पाहिली.  मी सदा भाऊंना बिलासंदर्भात फोन केला असता त्यांनी मला लेका मी आता मंत्री झालोय, तुझं रं कसलं बिल असे बोलून अपमानीत केले, असा आरोप केला.  ते काही नाही माझ्या बिलाचा विषयी मिटवा आणि मगच येथून जावा असे म्हणत मंत्री सदा भाऊना हॅाटेल मालकाने अडवले.

तुमच्या बिलासंदर्भात मला काहीच माहिती नाही, असे म्हणताच हॉटेल मालकांनी तुमचा मुलगा सागर याला सगळे माहित आहे. मला कोणी समजवायचे गरज नाही असे ते म्हणाले. यानंतर भाऊंनी असेल बील तर देऊन टाकू असे म्हणून गर्दीतून काढता पाय घेतला आणि ते खाली मान घालून कार्यक्रमाच्या ठिकाणी निघून गेले.

यावेळी रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले, तालुकाध्यक्ष भारत चव्हाण, प्रा. संजय देशमुख, शंभू माने यांनी हॅाटेल मालकाला समजावण्याचा प्रयत्न केला. तुझे जे काय बील असेल ते आम्ही देतो परंतु गोंधळ घालू नको, असं यावेळी त्याला सांगितले. पण संतप्त झालेल्या हॅाटेल मालकाने, तुम्ही यामध्ये पडू नका माझं मी बघून घेतो असा समज दिला.

यावेळी बंदोबस्तावरील पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन वाघ, पोलीस नाईक अमर पाटील यांनी गर्दीतून अशोक शिनगारे यास समजावत तेथून घेऊन गेले. घडल्या प्रकारामुळे पंचायत समिती आवारात सर्वजण काय झाले, कशाचा गोंधळ आहे म्हणून एकमेकांना विचारणा करीत होते. दरम्यान याबाबत आ. सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक आदिनाथ खपाले यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी कसलेही बिल नाही. असते तर भाऊंनी ते कधीच भागवले असते. ही त्याची निव्वळ स्टंटबाजी असल्याचे म्हटले.

दरम्यान या प्रकारानंतर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तात्काळ सांगोला पंचायत समिती येथे येऊन माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा केली. यावेळी भाऊंनी संबंधीत अशोक शिनगारे याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT