पुढारी ऑनलाईन: कॅनडातील विंडसरमध्ये भारताविरोधी पोस्टरबाजी करत, हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. विंडसर पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विट करून याची माहिती दिली आहे. यामध्ये काळ्या कपड्यातील दोन अज्ञात व्यक्ती मंदिराच्या भितींवर काळ्या स्प्रेने भारतविरोधी लिहताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या संंशयितांचा आणि घटनेचा पोलिस तपास करत आहेत, अशी माहिती विंडसर पोलिसांनी दिली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विंडसर येथील एका स्वामीनारायण या हिंदू मंदिराची काही अज्ञातांनी मंगळवारी (दि.०४) अचानक तोडफोड केली आहे. येथील मंदिराच्या परिसरातील भिंतींवर भारतविरोधी द्वेष व्यक्त करणारी पोस्टर्स लावण्यात आली.
गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून अशा प्रकारच्या भित्तिचित्रांनी मंदिराची विटंबना होण्याची ही पाचवी घटना आहे.
देशाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने २०१९ आणि २०२१ दरम्यान कॅनडामध्ये धर्म, लैंगिक प्रवृत्ती आणि वंश यांसारख्या द्वेष गुन्ह्यांमध्ये ७२ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे कॅनडात अल्पसंख्याक समुदायांमध्ये भीती वाढली आहे, विशेषत: भारतीय समुदाय, जो कॅनडातील सर्वात वेगाने वाढणारा लोकसंख्या समूह आहे. ज्याची कॅनडेच्या लोकसंख्येत जवळपास चार टक्के वाटा आहे. कॅनडात खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा भारतीय अधिकाऱ्यांनी वारंवार उपस्थित केला आहे.