पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूतील इरोडे जिल्ह्यातील चेन्निमलाई मुरुगन मंदिर असलेल्या पर्वताचे नामांतर येसू मल्ला किंवा कलवारी मल्ला असे करण्याची मागणी स्थानिक ख्रिश्चन समूदायाने केली आहे. यातून इरोडे जिल्ह्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदू मुन्नानी या संघटेनेच्या नेतृत्वाखाली या विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे. (Chennimalai Murugan Temple Hill)
चेन्निमलाईला सिरगिरी, चेन्नियानगिरी या नावांनीही ओळखले जाते. इरोडे जिल्ह्यात याला मोठे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. या पर्वतावरील मंदिराला तीन हजार वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. भगवान श्री मृगाचे येथे मंदिर आहे. श्री बाला देवआर्या स्वामिगल यांनी कंद सष्ठी कवचम या स्तोत्रांचे वाचन याच मंदिरात केले होते. त्यामुळे नामांतराच्या प्रयत्नांना मोठा विरोध होत असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र Organiser मध्ये दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
"हा परिसर हिंदूबहुल आहे. पण या परिसरात ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी बेकायदेशीररीत्या ख्रिश्चन प्रार्थनांचे आयोजन केले होते. याला शहराबाहेरून नागरिक येतात. हे तणावाचे कारण ठरत आहे," असे Organiserने म्हटले आहे. या बैठकांतून लाऊडस्पिकरवर हिंदू देवदेवतांचा अवमान केला जातो, असेही या बातमीत म्हटले आहे.
१७ सप्टेंबरला भारतीय जनता पक्ष आणि हिंदू मुनानी संघटनेचे पदाधिकारी यांनी एकत्र येत या प्रार्थनासभांना विरोध केला होता. यातून वाद होऊन, धक्काबुक्कीही झाली होती. यावर पोलिसांत तक्रार नोंद झाली आहे. या घटनेनंतर २६ सप्टेंबरला रिव्होल्युशनरी युथ फ्रंट, विदूथलाई चिरुथाईगल कच्ची, एमडीएमके या ख्रिस्ती संघटनांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात चेन्निमलाई मुरुगन मंदिर पर्वताच्या नामांतराची मागणी करण्यात आली, यातून तणाव अधिकच वाढला.
हिंदू संघटनांचे नेतृत्व हिंदू मुन्नानी ही संघटना करत आहेत. या संघटनांनी या मागणीचा निषेध केला आहे. ख्रिश्चन संघटनाना राजकीय नेत्यांचे पाठबळ आहे, असा या संघटनांचा दावा आहे. नामांतराच्या मागणी विरोधात हिंदूंनी पदयात्रेचे आयोजन केले असून ही पदयात्रा १३ ऑक्टोबरला मंदिरात पोहोचणार आहे.
हेही वाचा