Latest

Gujarat Assembly Election 2022 | गुजरात निवडणुकीआधीच काँग्रेसला धक्का, हिमांशू व्यास यांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणुकीआधी (Gujarat Assembly Election 2022) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रभारी सचिव असलेला हिमांशू व्यास यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हिंमाशू व्यास यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवून दिला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिमांशू व्यास यांनी सुरेंद्रनगरच्या वडवान येथून दोनवेळा निवडणूक लढवली होती. पण दोन्ही वेळेला त्यांना भाजप उमेदवारांकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हिमांशू व्यास सॅम पित्रोदा यांचे निकटवर्तीय मानले जातात.

काँग्रेस पक्षातील पदाचा राजीनामा दिल्यानंतर हिमांशू व्यास यांनी काँग्रेसवर अनेक आरोप केले आहेत. काँग्रेसमध्ये त्यांचे म्हणणे कोणी ऐकून घेत नव्हते. राहुल गांधी यांना भेटणे मुश्किल झाले होते. गुजरातमध्ये भाजप पुन्हा जिंकणार असून पुन्हा त्यांचे सरकार सत्तेवर येणार आहे. काँग्रेसचे नेतृत्व आणि संघटन यांच्यात संवाद नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांअंती भाजपचेच सरकार स्थापन होईल, असा निष्कर्ष ऑक्टोबर महिन्यात केलेल्या एका सर्व्हेतून 'सी-व्होटर'ने काढलेला आहे. सर्व्हेनुसार, भाजपला १३९ पर्यंत जागा मिळतील. 'सी व्होटर'चा निष्कर्ष खरा ठरल्यास भाजपचा आगामी विजय हा गेल्या २७ वर्षांत राज्यातील सर्वात मोठा विजय ठरेल.

गेल्या २७ वर्षांपासून गुजरात 'राज्यात भाजप सातत्याने सत्तेत आहे. पक्षाला २००२ च्या निवडणुकांमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक १२७ जागा मिळाल्या होत्या. २००२ च्या निवडणुकांमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक १२७ जागा मिळाल्या होत्या. २००२ च्या निवडणुका या दंगलींनंतरच्या निवडणुका होत्या, तर आगामी निवडणुका या मोरबी झुलता पूल दुर्घटनेनंतरच्या निवडणुका आहेत. सर्व्हेनुसार, भाजपला १३१ ते १३९ जागा, काँग्रेसला ३१ ते ३९, तर आम आदमी पक्षाला ७ ते १५ जागा मिळणार आहेत.

२०१७ च्या निवडणुकीत भाजपने १८२ पैकी ९९ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसनेही तेव्हा मुसंडी मारली होती. तब्बल ७७ जागा जिंकण्यात यश मिळविले होते. एकुण मतदानापैकी  ४९ टक्के मते भाजपला, तर ४४ टक्के मते काँग्रेसला मिळाली होती. गुजरातेत १८२ विधानसभा मतदारसंघांतून पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. ८ डिसेंबर रोजी सर्व १८२ जागांचे निकाल जाहीर होतील. गुजरातच्या जनतेचा मुड जाणून घेण्यासाठी 'सी व्होटर'ने विविध समाजघटक तसेच स्तरांतील २२ हजार ८०७ जणांची मते जाणून घेतली. सर्व्हेनुसार, गुजरातच्या ५६ टक्के नागरिकांना निवडणुकीत भाजपच विजयी होणार, असा विश्वास आहे. काँग्रेस ही निवडणूक जिंकेल, असे १७ टक्के लोकांना वाटते. (Gujarat Assembly Election 2022)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT