

अहमदाबाद : वृत्तसंस्था; गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांअंती भाजपचेच सरकार स्थापन होईल, असा निष्कर्ष ऑक्टोबर महिन्यात केलेल्या एका सर्व्हेतून 'सी-व्होटर'ने काढलेला आहे. सर्व्हेनुसार, भाजपला १३९ पर्यंत जागा मिळतील. 'सी व्होटर'चा निष्कर्ष खरा ठरल्यास भाजपचा आगामी विजय हा गेल्या २७ वर्षांत राज्यातील सर्वात मोठा विजय ठरेल.
गेल्या २७ वर्षांपासून गुजरात 'राज्यात भाजप सातत्याने सत्तेत आहे. पक्षाला २००२ च्या निवडणुकांमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक १२७ जागा मिळाल्या होत्या. २००२ च्या निवडणुकांमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक १२७ जागा मिळाल्या होत्या. २००२ च्या निवडणुका या दंगलींनंतरच्या निवडणुका होत्या, तर आगामी निवडणुका या मोरबी झुलता पूल दुर्घटनेनंतरच्या निवडणुका आहेत. सर्व्हेनुसार, भाजपला १३१ ते १३९ जागा, काँग्रेसला ३१ ते ३९, तर आम आदमी पक्षाला ७ ते १५ जागा मिळणार आहेत.
२०१७ च्या निवडणुकीत भाजपने १८२ पैकी ९९ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसनेही तेव्हा मुसंडी मारली होती. तब्बल ७७ जागा जिंकण्यात यश मिळविले होते. एकुण मतदानापैकी ४९ टक्के मते भाजपला, तर ४४ टक्के मते काँग्रेसला मिळाली होती. गुजरातेत १८२ विधानसभा मतदारसंघांतून पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. ८ डिसेंबर रोजी सर्व १८२ जागांचे निकाल जाहीर होतील. गुजरातच्या जनतेचा मुड जाणून घेण्यासाठी 'सी व्होटर'ने विविध समाजघटक तसेच स्तरांतील २२ हजार ८०७ जणांची मते जाणून घेतली. सर्व्हेनुसार, गुजरातच्या ५६ टक्के नागरिकांना निवडणुकीत भाजपच विजयी होणार, असा विश्वास आहे. काँग्रेस ही निवडणूक जिंकेल, असे १७ टक्के लोकांना वाटते.
आम आदमीपक्षाच्या बाजूने २० टक्के जनतेचा कौल होता. चार टक्केच लोकांना ही निवडणूक कोणता पक्षा जिंकेल आणि कोणाचे सरकार राज्यात येईल, या प्रश्नाचे उत्तर देता आलेले नाही. आम आदमी पक्षाने गेल्या निवडणुकीत ३० जागांवरच उमेदवार दिले होते. बहुतांश जागांवर या पक्षाची अमानत रक्कम जप्त झाली होती. आता पक्षाने आपला भावी मुख्यमंत्री म्हणून इसूदान गढवी यांचे नाव जाहीर करून वातावरण तयार करण्यात आघाडी घेतलेली असली, तरी सर्व्हेच्या निष्कर्षांत त्याचा फारसा जोर दिसलेला नाही. काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.
भाजप : १३१ ते १३९
काँग्रेस : ३१ ते ३९
आप: ७ ते १५
इतर : २
जातीय ध्रुवीकरण : १९ टक्के
राष्ट्रीय सुरक्षा : २७ टक्के
राज्य सरकारचे काम : १६ टक्के आहे.
मोदी-शहांचे कार्य : १७ टक्के
'आप'ची एंट्री : १६ टक्के
अन्य : ५ टक्के
सर्व्हेतून ६५ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य तसेच त्यांच्या कार्यपद्धतीसाठी 'उत्तम' असा शेरा दिला आहे. पंधरा टक्के लोकांनी मोदींचे कार्य ठिक असल्याचे म्हटलेले आहे; तर २० टक्के लोकांना 'वाईट' असा शेरा मारला आहे.