Latest

हिजाब समर्थकांचा बेळगावात गोंधळ, ६ युवक ताब्यात

अनुराधा कोरवी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : हिजाबवरून उडपी, चिक्‍कमगळूरमध्ये सुरू झालेले वादंग बेळगावपर्यंत पोचले असून, गुरुवारी सदाशिवनगर येथील पॅरामेडिकल महाविद्यालयात हिजाबवरून वादावादी झाली. त्यातच महाविद्यालयाशी संबंध नसलेल्या हिजाबसमर्थक युवकांनी गोंधळ घातल्याने पोलिसांनी लाठीमार केला, तसेच सहा जणांना ताब्यात घेतलेे. दरम्यान, हिजाबला परवानगी द्यावी की नाही, याबाबतची सुनावणी गुरुवारी अपूर्ण राहिली. शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे.

गुरुवारी काही विद्यार्थिनी सदाशिव नगरातील महाविद्यालयात हिजाब घालून गेल्या होत्या. त्यांना व्यवस्थापनाने प्रवेश नाकारला. त्यामुळे वादंग माजले. काही वेळातच हिजाब समर्थक युवक महाविद्यालयाजवळ जमले. ते घोषणा देऊ लागले. त्यामुळे वादात भर पडली.

तातडीने ही माहिती पोलिसांना देण्यात आली. एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सामोपचाराने प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र काही युवकांनी हिजाबचा आग्रह सुरूच ठेवला. त्यावरून पोलिस व हिजाबसमर्थकांत वादावादी झाली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत 6 जणांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर परीसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस आयुक्‍त बोरलिंगय्या, तहसीलदार आ.के कुलकर्णी यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.

केंद्र सरकारला अहवाल

राज्यातील हिजाब वादप्रकरणी केंद्र सरकारला अहवाल पाठवल्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले. या प्रकरणात काही संघटनांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. अशा संघटनांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.

बेळगावात धमकी

हिजाबचे समर्थन करणार्‍या कार्यकर्त्या सीमा इनामदार यांना अनोळखी व्यक्‍तीकडून निनावी फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिस आयुक्‍तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचलंत का? 

महाविद्यालयाशी संबंध नसणार्‍यांनी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा.
– बोरलिंगय्या, पोलिस आयुक्‍त

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची सूचना प्राचार्यांना करण्यात आली आहे. त्यानुसारच हिजाबधारींना प्रवेश नाकारण्यात आला.
– आर. के. कुलकर्णी, तहसीलदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT