पुढारी ऑनलाईन डेस्क : आधुनिक जीवनशैलीत महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा झटका ( हार्ट अटॅक ) येण्याचे प्रमाण अधिक आहे, असे मानले जात होते. मात्र मागील काही वर्षांमध्ये महिलांमध्येही हा विकार वाढला आहे. ( Heart Disease and Women ) मात्र महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी एक महिना आधी शरीर संकेत देत असते, असे अमेरिकेतील हार्वर्ड हेल्थ इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. जाणून घेवूया नवीन सर्वेक्षणातील माहिती…
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी महिलांचे शरीर कोणते संकेत देते, याची माहिती घेण्यासाठी अमेरिकेतील हार्वर्ड हेल्थ इन्स्टिट्यूटने
हार्ट अटॅक आलेल्या ५०० महिलांचे सर्वेक्षण केले. ९५ टक्के महिलांनी हार्ट अटॅक येण्यापूर्वी महिनाभर आधी शरीर कोणते संकेत देते होते, याची माहिती दिली. त्यामुळे हार्ट अटॅक अचानक येतो हा समज दूर होण्यास मदत झाली आहे.
सर्वेक्षणातील निष्कर्षांमध्ये म्हटलं आहे की, महिलांना हार्ट ॲटक येण्यापूर्वी शरीर काही संकेत देते. यामध्ये प्रचंड थकवा येणे आणि झोप न येण्याची समस्या जाणवते. त्याचबरोबर श्वास घेण्यास त्रास होणे, खूप घाम येणे, चक्कर येणे अशीही प्रमुख लक्षणे दिसून येतात. विशेष म्हणजे, या सर्वेक्षणात आढळले की, बहुतांश पुरुषांना हार्ट ॲटक येण्यापूर्वी छात्तीत प्रचंड वेदना होतात. मात्र हे लक्षण महिलांच्या यादीत सर्वात निचांकी आढळले. केवळ एक तृतीयांश महिलांनी छातीत दुखल्यानंतर हार्ट अटॅक असल्याचे सांगितले.
या सर्वेक्षणावर टिप्पणी करताना हार्वर्ड हेल्थ इन्स्टिट्यूटने म्हटलं आहे की, आम्ही केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे की, महिलांना प्रचंड प्रमाणात येणारा थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, झाोप न येणे हे शरीरात होणारे बदल हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात. महिलांमध्ये अशी लक्षणे दिसत असतील तर त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही केलेल्या सर्वेक्षणाचा हृदय विकाराच्या संशाोधनात फायदा होईल, असा विश्वासही हार्वर्ड हेल्थ इन्स्टिट्यूटने व्यक्त केला आहे.
हार्ट अटॅकचा ( हृदयविकाराचा झटका ) धोका टाळण्यासाठी सर्वप्रथम जीवनशैली ( लाईफस्टाईल) निरोगी बनवणे
आवश्यक आहे. ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या माहितीनुसार, योग्य आहार, दररोज नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रणात ठेवल्याने तुम्ही हार्ट अटॅकचा धोका टाळू शकता. निरोगी हद्यासाठी धूम्रपान आणि मद्यसेवन बंद करणे आवश्यक आहे. तसेच महिलांनी नियमित रक्तदाब, कोलेस्टेरॉल पातळी आणि शुगर तपासणी करणे आवश्यक आहे.
हेही वाचा :