मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या स्थितीत राजीनामा द्यायला पाहिजे होता. अल्पमतात आलेले महाविकास आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा करीत असलेला दावा हास्यास्पद आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले.
शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. काही अपक्ष आमदार शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. आता बहुमत भाजप, एकनाथ शिंदे आणि महायुतीकडे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा लवकर करावा, असे आवाहन आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे.
शिवसेनेचे जे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत. पोलिसांच्या समोर हल्ले होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेचा वारसा आहे. त्यावर हल्ला होत आहे. राज्याची प्रतिमा डागाळली जात आहे. यावर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी कठोर भूमिका घेऊन पोलिसांना कायदा सुव्यवस्थेबाबत कर्तव्य पार पाडण्याचे निर्देश द्यावेत, असे मतही आठवले यांनी व्यक्त केले.
शिवसेनेने पराभव स्वीकारला पाहिजे. त्यासाठी आमदारांच्या कार्यालयावर हल्ले करणे , गुंडगिरी करणे योग्य नाही. शिवसेनेने गुंडगिरी थांबवावी. अन्यथा गुंडगिरीला गुंडगिरीने उत्तर द्यावे लागेल. गुंडगिरीने शिवसेना सरकार वाचवू शकणार नाही, असा इशारा आठवले यांनी दिला आहे.