पुढारी ऑनलाईन डेस्क :
गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी आज गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या निर्णयाची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
मी आज काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. मला विश्वास आहे की, माझ्या या निर्णयाचे स्वागत गुजरातमधील जनता आणि माझे साथीदार करतील, असा मला विश्वास आहे. मला वाटतं की, या निर्णयानंतर मी भविष्यात गुजरातसाठी सकारात्मक दृष्टीकाेनातून कार्य करेन, असे हार्दिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पाटीदार नेता व गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल ( Hardik Patel ) हे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा मागील काही दिवस गुजरातच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. भाजप नेतृत्वाचे कौतुक करत काँग्रेसमध्ये होत असलेली घुसमटही त्यांनी वारंवार व्यक्त केली होती.
भाजपचे नेते धडाकेबाज निर्णय घेत आहेत. आमच्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत, असे सूचक विधानही त्यांनी मागील महिन्यात केले होते. राहुल गांधी व प्रियांका वड्रा-गांधी यांच्यामुळे मी दु:खी नाही. तर गुजरात प्रदेश काँग्रेस नेतृत्त्वामुळे मी व्यथित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. याचचेळी हार्दिक लवकर काँग्रेसला साेडचिठ्ठी देतील, अशी चर्चा गुजरातमधील राजकीय वर्तुळात हाेती.