गोवा

गोवा निवडणूक : चाळीसपैकी 39 उमेदवार कोट्यधीश ; अडीच टक्के उमेदवारांची संपत्ती 50 लाख ते दोन कोटींपर्यंत

मोनिका क्षीरसागर

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी राज्यात उपलब्ध असलेला सर्वोच्च मंच म्हणजे विधानसभा. या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांपैकी 75 टक्के उमेदवार हे पाच कोटी रुपये आणि त्याहून अधिक रकमेच्या संपत्तीचे मालक आहेत. यामुळे गरिबांचे नेमके प्रश्‍न काय आणि गरिबांची परवड कशी होते याविषयीची जाणीव किती सजग असेल याविषयी प्रश्‍न निर्माण होण्यास जागा आहे. सांतआंद्रे मतदारसंघातून रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे विजयी उमेदवार वीरेश बोरकर हे केवळ कोट्यधीश उमेदवार नाहीत.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस (एडीआर) या स्वयंसेवी संघटनेने केलेल्या पाहणीत ही आकडेवारी समोर आली आहे. या संस्थेने उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करून हा निष्कर्ष काढला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिंकलेल्या उमेदवारांपैकी 20 टक्के उमेदवारांची संपत्ती दोन कोटी रुपये ते पाच कोटी रुपयांपर्यंत आहे. अडीच टक्के उमेदवारांची संपत्ती 50 लाख रुपये ते दोन कोटी रुपयांपर्यंत आहे. अडीच टक्के उमेदवारांची संपत्ती ही 50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या आकडेवारीनुसार पाच कोटी रुपये आणि त्याहून अधिक संपत्ती असलेले तब्बल तीस आमदार या विधानसभेत दिसणार आहेत. दोन कोटी रुपये ते पाच कोटी रुपये दरम्यान संपत्ती असणारे आठ, तर पन्नास लाख रुपये ते दोन कोटी रुपयांपर्यंतची संपत्ती असणारा एक आणि पन्नास लाख रुपयांपेक्षा कमी संपत्ती असलेला एक आमदार विधानसभेत असेल.

या विश्‍लेषणानुसार 2017 मधील आमदारांची संपत्ती सर्वसाधारणपणे दहा कोटी 90 लाख रुपये होती, तर आता अस्तित्वात येणार्‍या विधानसभेतील आमदारांची सरासरी संपत्ती ही 20 कोटी 16 लाख रुपयांची असेल. यापैकी सर्वाधिक संपत्तीही मायकल व दिलायला लोबो यांची 92 कोटी 91 लाख 1 हजार 865 रुपयांची आहे. डिचोली येथून अपक्ष निवडून आलेले डॉ. चंद्रकांत शेट्ये हे संपत्तीच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. 59 कोटी 63 लाख 1 हजार 413 रुपयांची त्यांची संपत्ती आहे.

राज्य विधानसभेत कोट्यधीश आमदारांची संख्या वाढत आहे. 2007 च्या निवडणुकीमध्ये पाच कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेले 20 टक्के म्हणजे आठ आमदार होते. 2012 च्या निवडणुकीत ही संख्या साडेबावन्न टक्क्यांवर म्हणजे 21 आमदार अशी झाली. 2017 च्या निवडणुकीत 67 टक्के आमदार हे पाच कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचे मालक होते. ही संख्या सत्तावीस होती आणि आताच्या निवडणुकीत ही संख्या 75 टक्क्यांवर गेली आहे, म्हणजे तीस आमदार हे पाच कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचे मालक आहेत. दहा कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेले 55 टक्के म्हणजे 22 आमदार आता स्थापन होणार्‍या विधानसभेत असतील. 2017 मध्ये केवळ दोन आमदार दहा कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचे मालक होते ही संख्या एकूण आमदार संख्येच्या केवळ पाच टक्के होती. 2012 मध्ये 30 टक्के आमदार म्हणजे बारा आमदार, 2017 मध्ये 37 टक्के म्हणजे पंधरा आमदार दहा कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचे मालक होते.

विधानसभेवर निवडून आलेल्या उमेदवारांची पैकी केवळ साडेसात टक्के उमेदवार महिला आहेत. केवळ तीन महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. 92.5 टक्के पुरुष उमेदवार निवडून आले आहेत. महिला आमदारांची संख्या मात्र वाढत आहे. 2007 मध्ये केवळ एक महिला आमदार होत्या. ही संख्या एकूण आमदार संख्येच्या केवळ तीन टक्के होती. 2012 मध्येही तसेच प्रमाण राहिले. 2017 मध्ये पाच टक्के आमदार महिला म्हणजे दोन आमदार महिला होत्या.

सर्वाधिक संपत्ती क्रमवारी…

मायकल व दिलायला लोबो -92 कोटी 91 लाख 1 हजार 865 रुपये
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये – 59 कोटी 63 लाख 1 हजार 413 रुपये

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT