Central Library Goa
काव्या कोळस्कर
पणजी : गोवा म्हटले की समुद्रकिनारे, क्रूझ, क्लब्स आणि पार्ट्यांचीच आठवण येते. मात्र, या पारंपरिक पर्यटनाच्या चौकटीबाहेर जाऊन काही वेगळे आणि ज्ञानवर्धक अनुभव घ्यायचा असेल, तर राजधानी पणजीतील कृष्णदास शामा गोवा मध्यवर्ती ग्रंथालय हे ठिकाण पर्यटकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.
१८३२ साली स्थापन झालेली ही लायब्ररी भारतातील सर्वात जुनी सार्वजनिक वाचनालय म्हणून ओळखली जाते. १५ फेब्रुवारी १८९७ रोजी या वाचनालयाला ' नॅशनल लायब्ररी'चा दर्जा देण्यात आला आणि ' Bibliotheca Nacional de Nova Goa' असे नामकरण करण्यात आले. पुढे १९२५ मध्ये Instituto Vasco da Gama या संस्थेशी संलग्न होऊन १९५२ च्या डिक्री लॉनुसार ' Biblioteca Nacional Vasco da Gama' असे नाव देण्यात आले. त्या काळात पोर्तुगाल व त्यांच्या वसाहतींमधील सर्व प्रकाशने इथेच जमा होत होती.
या दीर्घ ऐतिहासिक प्रवासामुळे ही वास्तू केवळ वाचनालय न राहता गोव्याच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक वारशाचे प्रतीक बनले आहे. त्यामुळे गोव्यात येऊन काहीतरी नवीन एक्सप्लोर करायचे असेल तर हा एक उत्तम पर्याय नक्कीच असू शकतो.
आजच्या घडीला या आधुनिक वाचनालयात २.४ लाखांहून अधिक पुस्तकांचा मोठा संग्रह उपलब्ध असून, इंग्रजी, मराठी, हिंदी, कोंकणी आणि पोर्तुगीज अशा विविध भाषांतील साहित्य येथे वाचकांना मिळते. आरएफआयडी तंत्रज्ञान, सेल्फ चेक-इन/चेक-आउट प्रणाली, डिजिटल कॅटलॉग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा ग्रंथालयात उपलब्ध आहेत. एकदा वाचनालयात पाय ठेवल्यानंतर सर्व विभाग, मजल्यांवरील पुस्तके, दस्तऐवज, हस्तलिखिते पाहण्यासाठी तुमचा अख्खा दिवसही कमी पडेल, यात शंका नाही.
त्यामुळे पुढच्या वेळी गोव्याच्या ट्रिपचे नियोजन करताना समुद्रकिनाऱ्यांसोबतच या ऐतिहासिक आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या ग्रंथालयाला आपल्या यादीत जरूर स्थान द्या. एक वेगळा, समृद्ध आणि संस्मरणीय अनुभव घेतल्याचे समाधान तुम्हाला मिळेल.
गोव्याला येणाऱ्या पर्यटकांना लायब्ररीची सविस्तर माहिती घेता यावी, इथे असलेल्या साहित्य साठ्याशी पर्यटक अवगत व्हावेत यासाठी त्यांना माहिती देणाऱ्या गाईडची देखील सुविधा उपलब्ध आहे, असे लायब्ररीच्या क्युरेटर सुलक्षा कोलमुळे यांनी सांगितले.
पर्यटकांनी गोव्यात आल्यावर इथला समृद्ध, ऐतिहासिक साहित्य वारसा जरूर अनुभवावा. लायब्ररीतील प्रत्येक मजला आणि विविध विभागांची सविस्तर माहिती घेतल्यानंतर, तसेच इतिहास, वास्तुरचना आणि दुर्मीळ पुस्तकांचा खजिना जवळून पाहण्याची संधी पर्यटकांनी नक्की घ्यावी.सुलक्षा कोलमुळे, क्युरेटर, मध्यवर्ती ग्रंथालय