MLA Vijay Sardesai pudhari photo
गोवा

Vijay Sardesai | तिसरा पर्याय : उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक!

Vijay Sardesai | आरजीमधील अंतर्गत गोंधळ अन् काँग्रेसमधील नेतृत्वाचा दुष्काळ; अल्पसंख्याक मतांची पोकळी भरून काढण्यास सरदेसाई सज्ज

पुढारी वृत्तसेवा

मयुरेश वाटवे

आम आदमी पक्षाकडून ख्रिस्ती मतदारांचा झालेला भ्रमनिरास, रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षातील सावळा गोंधळ, नेतृत्वाअभावी काँग्रेसपासून दूर जाणार अल्पसंख्य समाज... ही सर्व पोकळी भरून काढण्याची उपलब्ध संधी पाहूनच विजय सरदेसाई यांनी तिसऱ्या पर्यायाची तुतारी फुंकली आहे. सध्या तरी त्याची अवस्था उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक अशी आहे.

तिसरा पर्याय : उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक!

विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाकडे सध्या एकच आमदार आहे. ते स्वत:च. भाजपच्या विरोधात राज्यात असंतोष आहे, पण एकाही निवडणुकीत या असंतोषाचे रूपांतर मतांत किंवा जागांत झालेले नाही. त्याचे एक कारण स्वत:च विजय सांगत की विरोधकांत एकी नाही. सध्या तरी विधानसभेत विरोधक म्हटले की अग्रक्रमाने नाव येते ते विजय सरदेसाई यांचेच. त्यानंतर रिव्होल्यूशनरी गोवन्सच्या वीरेश बोरकर यांचे.

राज्यात विरोधातील आवाजाला अवकाश आहे. २०२२ मध्ये १० टक्के मते आणि एक आमदार अशी कामगिरी करणाऱ्या रिव्होल्यूशनरी गोवन्सने निवडणुकीच्या ऐन तोंडावर ‘सेल्फ गोल’ केलेला आहे. या पक्षात सावळा गोंधळ आहे. पक्षातच काही स्थिरस्थावर नसताना मतदार त्यांच्या बाजूने जाण्याची जोखीम कितपत पत्करतील हा प्रश्न आहे. मनोज परब हाच आरजीचा हिंदू-ख्रिस्ती मतदारांना एकत्र आणणारा चेहरा होता. त्यांनी सर्व पदांचा राजीनामा देऊन राजकारण संन्यास घेतलेला आहे.

दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्येही अंतर्गत लाथाळ्या आहेत. २०२२ च्या निवडणुकीनंतर जवळपास साडेचार वर्षे प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेल्या अमित पाटकर यांना बाजूला करून राहुल गांधी यांच्या मर्जीतील गिरीश चोडणकर यांच्या गळ्यात पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातल्यानंतर पक्षातूनच विरोध सुरू झाला आहे. काँग्रेसमध्ये हे घडतच असते. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जे गांभीर्य हवे ते त्यांना नाही. त्यामुळे लोकही त्यांना अलीकडे गांभीर्याने घेत नाहीत. पण भाजपविरोधी मते आणि तथाकथित सेक्युलर लोक त्यांच्यासोबत आहेत. हा सगळा विरोध ‘चॅनेलाईज’ करण्यासाठी एक चुंबकीय चेहरा पक्षाकडे हवा. काँग्रेसकडे सध्या त्याचा दुष्काळ आहे.

भाजपविरोधातील आक्रोशाला वाट आणि अल्पसंख्य समाजाला जवळ करणारी शक्तीच त्यामुळे क्षीण झाली आहे. ही राजकीय पोकळी भरून काढण्याची संधी विजय सरदेसाई यांना दिसते आहे. प्रत्येक मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात विश्वासार्ह चेहरा दिल्यास आपल्याला संधी मिळू शकते असे विजय सरदेसाई यांचे गणित असू शकते. ते फार चुकीचे नाही. त्यांनी अलीकडेच व्यावसायिक पद्धतीने सर्व्हे करून घेतलेला आहे.

एक निष्कर्ष आला आहे, दुसरा निष्कर्ष तीन आठवड्यांत येईल असे सरदेसाई यांचे म्हणणे आहे. त्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करतील. किंग बनण्याची त्यांची इच्छा असली तरी किमान किंगमेकर बनण्याच्या भूमिकेत यावे असे लक्ष्य ते ठेवू शकतात. खंडित जनादेश आल्यास काय सांगावे ते किंगही बनू शकतील. तामिळनाडूतील टीव्हीकेच्या यशानंतर अशा चमत्काराची अंधुक आशा प्रत्येकाला असेल.

आम्ही २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसबरोबर आहोत असे विजय सरदेसाई यांनी वारंवार म्हटलेले आहे. मात्र गेल्या विधानसभा अधिवेशना दरम्यान, त्यांना विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी ज्युडास (घातकी) म्हटल्यानंतर पहिली ठिणगी पडली. त्यानंतर काँग्रेस आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाकडून वारंवार त्यांना लक्ष्य करण्यात आले. जिल्हा पंचायत निवडणुकीत काही ठिकाणी ‘मैत्रीपूर्ण लढतीच्या’ नावाखाली काँग्रेसनेही उमेदवार दिल्यामुळे गोवा फॉरवर्डचे उमेदवार पराभूत झाले.

विशेषत: पैंगीण आणि खोर्ली मतदारसंघातील पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा होता. त्यानंतर, फोंडा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला आमचा पाठिंबा आहे, पण आम्ही त्यांच्या प्रचारासाठी जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर येणे ही उंटावरच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली. आणि त्यांनी बिगर भाजप, बिगर काँग्रेस अशा तिसऱ्या पर्यायाचे सुतोवाच केले.

दोन वर्षांपूर्वी गोवा फॉरवर्ड काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी आपण दाखवली होती. त्यासंदर्भात काँग्रेसचे गोवा डेस्क इन्चार्ज माणिकराव ठाकरे यांच्यासोबत बैठकाही झाल्या असे सरदेसाई यांचे म्हणणे आहे. गिरीश चोडणकर यांचाच विलिनीकरणाला विरोध होता अशी त्यांची अंतर्गत माहिती. प्रदेशाध्यक्षपदी आल्यापासून काँग्रेस २१ जागा जिंकणार, काँग्रेसला २१ जागा द्याव्यात अशी वक्तव्ये गिरीश करत आहेत. त्यामुळे गोवा फॉरवर्ड काँग्रेसच्या खिजगणतीतही नाही अशी विजय सरदेसाई यांची भावना झाली आहे.

काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की आपली ‘बार्गेनिंग पावर’ वाढवण्याचा सरदेसाईंचा हा प्रयत्न आहे. ती शक्यता पूर्णत: फेटाळता येत नाही. राजकारणात प्रत्येक जणच ते करत असतो. पण ज्या पद्धतीने सरदेसाई बोलले आहेत ते पाहता माघारीच्या शक्यता संपलेल्या दिसतात. काँग्रेसला विरोधकांना एकत्र घेऊन जाण्यात रस नसेल तर तो ठेका मीच घेतला आहे का, असे विजय यांना वाटल्यास ते गैर नाही.

सध्या त्यांच्याकडे स्वत:ची एकच जागा आहे. या निर्णयातून त्यांचे फार नुकसान होण्याची शक्यता नाही. झाले तर नुकसान काँग्रेसचेच होईल. फायदा झाला तर गोवा फॉरवर्डचा होईल. सासष्टीच्या बालेकिल्ल्यातच २०२२ मध्ये काँग्रेसच्या गडाला खिंडार पडलेले आहे. सध्या सासष्टीतील आठपैकी मडगाव, नुवे (काँग्रेसचे मतदारसंघ. पण दोन्ही आमदारांनी भाजपात पक्षांतर केले) व नावेली या तीन जागा भाजपकडे आहेत, बाणावली व वेळ्ळी आम आदमी पार्टीकडे आहेत. कुडतरीत अपक्ष आलेक्स रेजिनाल्ड आहेत.

फातोर्डा विजय यांच्याकडेच आहे. (ते तेव्हा काँग्रेस - गोवा फॉरवर्ड युतीचे उमेदवार होते.) कुंकळ्ळी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांच्याकडे आहे. सासष्टी पलीकडे अस्तित्व नसलेल्या काँग्रेसची सासष्टीतीलच ही सध्याची अवस्था आहे. सासष्टीपुरती मर्यादित झालेली काँग्रेस एका अर्थी गोवा फॉरवर्डच्या गळ्यातली धोंड ठरत आहे. सासष्टीचे आठ मतदारसंघ सोडले तर इतर ३२ मतदारसंघांत हा जो ख्रिस्ती मताच्या (मतांचा नव्हे) अभिव्यक्तीचा व्हॅक्यूम तयार झालेला आहे, तो एनकॅश करण्यासाठी एक विश्वासू चेहरा लागणार आहे. तो चेहरा विजय सरदेसाई असू शकतात.

उत्तर गोव्यात काँग्रेसचे काम शून्य आहे. उत्तर गोव्यात ख्रिस्ती नेता घेऊन -तोही सासष्टीतला-विजय मिळवणे काँग्रेसला कठीण जाणार आहे. विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्डने २०१७ साली साळगाव व शिवोली हे उत्तर गोव्यातील दोन मतदारसंघ जिंकले होते. २०२२ साली मये, मांद्रे व फातोर्ड्यात त्यांचे उमेदवार होते. भाजपविरोधी नाराजी मतांत रूपांतरीत करण्याची क्षमता उत्तर गोव्यात विजय यांच्याकडे आहे.

ख्रिस्ती समर्थक हिंदू नेता म्हणून विजय सरदेसाई एक चांगली निवड ठरू शकतात. उत्तरेत या पक्षाला वाढायला संधी आहे. काँग्रेसबरोबर युतीत कनिष्ठ भागीदार असताना ते हे करू शकणार नाहीत. हे सर्व लक्षात घेऊनच विजय सरदेसाई यांनी वेगळा सूर लावला असण्याची शक्यता आहे. मात्र भाजप व काँग्रेसला बाजूला ठेवून तिसरा पर्याय म्हणून २१ जागा कुणी जिंकू शकेल ही शक्यता आता तरी धूसर दिसते आहे. पण नाही तरी काँग्रेसशी युती करून गोवा फॉरवर्डच्या पदरात किती जागा पडणार आहेत? दहा? मागच्या वेळी तीनच दिल्या होत्या.

फुटिरांना तिकिटे नाहीत वगैरे थोतांडे ते करतील असे वाटत नाही. भाजपसारख्या मोठ्या पक्षाला जे परवडत नाही ते गोवा फॉरवर्डसारख्या प्रादेशिक पक्षालाही परवडणार नाही. ‘विनेबिलिटी’ हा एकच निकष लावल्यास त्यांना उमेदवार मिळू शकतात.

गेल्यावर्षी गणेश चतुर्थीत उत्तर गोव्यातील अनेक भंडारी नेत्यांच्या घरी भेटी देऊन सरदेसाई यांनी चाचपणी सुरू केली होती. यंदा गणेश चतुर्थीत अधिक चांगला अंदाज त्यांना येऊ शकेल. भाजपमधून निवडणूक लढवू इच्छिणारे खूप उमेदवार प्रत्येक मतदारसंघात तयार झाले आहेत. काही जणांना ध्येयधोरणे, नीतीमत्तेशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त निवडणूक लढवायची आहे, कारण त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांना एक चिन्ह हवे आहे. गोवा फॉरवर्डचा ‘नारळ’ हे लोकांना माहीत असलेले चिन्ह आहे. गोवा फॉरवर्डसाठी ही जमेची बाजू आणि विनविन स्थिती आहे. त्यामुळे ते कदाचित उत्तरेत ‘युगोडेपा प्रयोग’ करू शकतात. सासष्टी आणि ख्रिस्ती गोव्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणारा ख्रिस्ती मतदार आज संभ्रमात आहे. २७ टक्क्यांच्या आसपास असलेल्या या समाजाची सासष्टीतील लोकसंख्या साधारण ४० टक्के किंवा अधिकच आहे. दक्षिण गोव्यात ख्रिस्ती ३६ टक्के आहेत तर उत्तर गोव्यात हे प्रमाण साधारण १५ टक्के आहे. २०२२ साली केवळ फातोर्डाच २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षाने काँग्रेससोबत आघाडी केली. पक्षाने फक्त ३ जागा लढवल्या आणि १ जागा जिंकली - फातोर्डा मतदारसंघातून स्वतः विजय सरदेसाई ११,०६३ मते घेऊन विजयी झाले. त्यांचा विजयाचा फरक १५२७ मतांचा होता. पक्षाला राज्यभरात एकूण १७,४७७ मते, म्हणजे १.८४ टक्के मतांचा वाटा मिळाला.

किंग की किंगमेकर? विजय सरदेसाई १३-१४ जागा खेचून आणू शकले तरी येत्या निवडणुकीनंतर ते किंग बनू शकतात असा त्यांचा होरा असावा. आताच्या घडीला हे थोडे अशक्यप्राय दिसत असले तरी काँग्रेस, भाजप व आरजीला कंटाळलेले अनेक चांगले उमेदवार गोवा फॉरवर्डकडे येऊ शकतात.

२०१७ साली जिंकलेल्या जागा सोडल्या २०१७ साली गोवा फॉरवर्डने फातोर्डा, शिवोली, साळगाव व वेळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यापैकी वेळ्ळी वगळता तिन्ही ठिकाणी त्यांना यश मिळाले. २०२२ साली काँग्रेसबरोबर त्यांची युती होती. गंमत म्हणजे वेळ्ळीसह २०१७ साली जिंकलेले शिवोली व साळगाव मतदारसंघ त्यांना काँग्रेससाठी सोडावे लागले. नव्याने लढवलेले मये व मांद्रे हे दोन्ही मतदारसंघ त्यांनी गमावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT