Goa Assembly Election | नावेलीत पुन्हा कमळ फुलणार?

Goa Assembly Election | भाजपची पकड घट्ट : काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून चुरस
BJP Operation Samarthan
भाजपचे आता ऑपरेशन समर्थनFile Photo
Published on
Updated on

सासष्टी : विठू सुकडकर

नावेली मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून अनेक वर्षे काँग्रेसच्या नेत्यांनी आमदार, मंत्री ते मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. मात्र, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच उल्हास तुयेकर यांनी विजय मिळवत भाजपचे कमळ फुलवले. गेल्या काही वर्षांत नावेली मतदारसंघात काही प्रमाणात भाजपची पकड वाढलेली दिसून येते. त्यामुळे यंदाही तुयेकर पुन्हा विजयी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BJP Operation Samarthan
पत्रकारितेतील अळंबी

नावेलीच्या राजकीय इतिहासावर नजर टाकल्यास माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो हे सुरुवातीला गोवा काँग्रेसच्या तिकिटावर बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर काँग्रेस (आय) तर्फे त्यांनी दीर्घकाळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २००७मध्ये 'सेव्ह गोवा' पक्षाच्या तिकिटावर चर्चिल आलेमाव विजयी झाले.

पुढे भाजपच्या पाठिंब्यावर आवेर्तान फुर्तादो अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आणि स्व. मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. २०२२ मध्ये उल्हास तुयेकर यांच्या विजयाने नावेलीत भाजपने पहिल्यांदाच आपले खाते उघडले. सध्या माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो सक्रिय राजकारणात फारसे दिसत नाहीत. त्यामुळे २०२७ ची निवडणूक ते लढवण्याची शक्यता कमी मानली जाते.

दुसरीकडे विद्यमान आमदार उल्हास तुयेकर हे मतदारसंघात सातत्याने सक्रिय असून विविध कार्यक्रमांद्वारे जनसंपर्क ठेवत आहेत. भाजपचे स्थानिक संघटनही मजबूत असून कार्यकर्ते वर्षभर लोकांमध्ये कार्यरत असल्याचे दिसते. त्यामुळे भाजपचा मतदारवर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.

काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे. माजी जिल्हा पंचायत सदस्य एडविन ऊर्फ सिप्रू कार्दोज हे मतदारसंघात सक्रिय असून ते काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार आहेत. त्यांनी यापूर्वी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून सुमारे साडेतीन हजार मते मिळवली होती. एसटी समाजातील प्रभाव आणि स्थानिक पातळीवरील संपर्क हे त्यांचे बलस्थान मानले जाते. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिल्यास पक्षाला काही प्रमाणात पोषक वातावरण निर्माण होऊ शकते.

माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो हे देखील काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर साडेतीन हजार मते मिळवली होती. काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते आणि पारंपरिक समर्थक त्यांच्या बाजूने असल्याचे दिसते. सुशिक्षित व उच्चवर्गीय मतदारांमध्येही त्यांचा प्रभाव आहे. माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांचा संभाव्य पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते.

माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी आपली कन्या अॅड. वालांका आलेमाव हिला काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. वालांका आलेमाव या मतदारसंघात परिचित चेहरा असून मागील निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांनी सुमारे साडेचार हजार मते मिळवत दुसरे स्थान पटकावले होते. त्यामुळे आलेमाव कुटुंबाचा स्वतंत्र मतदारवर्ग असल्याचे स्पष्ट होते.

२०१२ मध्ये चर्चिल आलेमाव यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती; मात्र अपक्ष उमेदवार आवेर्तान फुर्तादो यांनी त्यांचा पराभव केला होता. आम आदमी पक्षाचे सदस्य सिद्धेश भगत हेही निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जाते. मात्र ते कोणत्या पक्षातून रिंगणात उतरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरलेले रेहान मुजावर यांनी सुमारे अडीच हजार मते मिळवली होती; मात्र सध्या ते विशेष सक्रिय दिसत नाहीत.

BJP Operation Samarthan
Goa Dr. Ketan Bhatkar |फोंड्यातील डॉ. केतन भाटकर यांचे आमदारकीचे स्वप्न राहिले अपुरे

भाजपची पकड मजबूत

नावेली मतदारसंघात भाजपने आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असताना काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी अनेक इच्छुक मैदानात आहेत. योग्य उमेदवार निवडणे हे काँग्रेससमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. आगामी काळात निवडणुकीची तारीख जवळ येत जाईल तशी राजकीय समीकरणे अधिक वेगाने बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नावेली मतदारसंघातील लढत यंदा अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

'आयर्न लेडी' पुन्हा रिंगणात ?

'आयर्न लेडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅड. प्रतिमा कुतिन्हो यादेखील संभाव्य दावेदार म्हणून चर्चेत आहेत. त्यांनी मागील निवडणूक आपच्या तिकिटावर लढवत सुमारे अडीच हजार मते मिळवली होती. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या कुतिन्हो सध्या कोणत्याही पक्षात नसल्या तरी त्या मतदारसंघात सक्रिय आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा संपर्क असल्याचे सांगितले जाते आणि त्या पुन्हा काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news