RG Party Rebuilding Before Election - पोरका' आरजी' निवडणुकीपर्यंत सावरेल का?

समर्थकांना पडलाय प्रश्न; वीरेश बोरकरांकडून पक्षाच्या पुनर्बाधणीसाठी आवाहन
RG Party Rebuilding Before Election
RG Party Rebuilding Before Election
Published on
Updated on

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर

गोव्यात २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच निवडणूक लढवून सुमारे १० टक्के मते मिळविणारा, एका जागेवर विजय मिळविणारा, दोन मतदारसंघांत दुसऱ्या क्रमांकाची आणि १२ मतदारसंघांत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्ष सध्या अंतर्गत मतभेदांमुळे अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. पक्षाध्यक्ष मनोज परब यांचा राजीनामा आणि पक्षातील प्रमुख नेत्यांमधील वाढता दुरावा यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष आपले अस्तित्व टिकवू शकेल का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

RG Party Rebuilding Before Election
भाजपचा बालेकिल्ला जोशुआ राखतील का?

आरजीचे आमदार वीरेश बोरकर आणि पक्षाचे माजी अध्यक्ष मनोज (तुकाराम) परब यांच्यात निर्माण झालेला दुरावा, एकमेकांवर सार्वजनिकरीत्या झालेली टीका आणि त्यानंतर मनोज परब यांनी अध्यक्षपदासह सर्व पदांचा दिलेला राजीनामा यामुळे पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्या पक्ष अध्यक्षाविना असल्याने संघटनात्मक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण आहे. मात्र, आमदार वीरेश बोरकर यांनी समंजस भूमिका घेत पक्षाची पुनर्बाधणी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे. सध्या तरी हीच बाब पक्षासाठी सकारात्मक मानली जात आहे.

२०२२ च्या निवडणुकीपूर्वी आरजी ही केवळ एक सामाजिक संघटना होती. मनोज परब यापूर्वी आम आदमी पक्षाशी संबंधित होते, तर इतर अनेक नेते संघटनेतूनच पुढे आले. 'उजो, उजो' अशा घोषणांसह युवकांना एकत्र करून संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर करण्यात आले. ४० पैकी ३७मतदारसंघांत उमेदवार उभे करून पक्षाने पहिल्याच निवडणुकीत सुमारे १० टक्के मते मिळविली.

RG Party Rebuilding Before Election
Kala Academy Closure | कला अकादमी १ ऑगस्टपासून होणार पुन्हा बंद !

बहुतांश मतदारसंघांत उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असली, तरी तिसवाडी तालुक्यातील सांत आंद्रे मतदारसंघात वीरेश बोरकर यांनी अवघ्या ७० मतांच्या फरकाने विजय मिळवून पक्षाचे खाते उघडले. भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांतील थेट लढतीत बोरकर यांनी बाजी मारली होती. वास्तव्यास आरजी पक्षाने सत्तेवर आल्यास 'पोगो' विधेयक मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच परदेशात असलेल्या गोमंतकीयांसाठी दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा पक्षाने प्रभावीपणे मांडला. त्यामुळे परदेशस्थ गोमंतकीयांकडून पक्षाला आर्थिक मदत मिळाली, तर त्यांच्या

कुटुंबीयांनी मतदानाद्वारे पाठिंबा दिला. याचाच परिणाम म्हणून पक्षाला लक्षणीय मतांची टक्केवारी मिळाल्याचे मानले जाते. मात्र, सध्या अध्यक्षाविना असलेल्या पक्षासमोर अनेक प्रश्न उभे आहेत. पुढील आठ महिन्यांत संघटना कशी विस्तारली जाणार, प्रचाराची रणनीती काय असेल, नव्या अध्यक्षाची निवड कधी होणार, अशा प्रश्नांची उत्तरे कार्यकर्ते शोधत आहेत.

राजकीय परिस्थितीचा विचार करता, आगामी निवडणुकीत आरजी पक्षाने २०२२ प्रमाणे 'एकला चलों'ची भूमिका घेतल्यास त्याचा फटका बसू शकतो. अशा परिस्थितीत विद्यमान आमदारकीही धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे काँग्रेससोबत युती करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, काँग्रेस नेतृत्वाकडून युतीसंदर्भात अपेक्षित उत्साह दिसत नसल्याने निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना आरजीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

जिल्हा पंचायतीत दोन जागांवर विजय

आठ महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत आरजी पक्षाने दोन जागांवर विजय मिळविला. सांताक्रुझ मतदारसंघातून एस्पेरांका ब्रागांझा यांना ४,५३३ मते मिळाली, तर सेंट लॉरेन्स मतदारसंघातून तृप्ती बकाल यांनी ५,८७० मते मिळवून विजय संपादन केला. सेंट लॉरेन्स हा भाग सांत आंद्रे मतदारसंघात येतो, तर सांताक्रुझचा काही भागही त्यात समाविष्ट आहे. कवळे मतदारसंघातून पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक ४,३०० मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. इतर अनेक ठिकाणी पक्षाचे उमेदवार तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर राहिले.

बोरकर यांच्यासमोर दोन पर्याय

आमदार वीरेश बोरकर यांच्यासमोर सध्या दोन प्रमुख पर्याय असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. पहिला पर्याय म्हणजे पक्षसंघटना मजबूत करून काँग्रेससोबत युती साधत सांत आंद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवणे. दुसरा पर्याय म्हणजे युती न झाल्यास आणि पक्षसंघटना अपेक्षित बळकट न झाल्यास काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणे. यापैकी कोणता मार्ग बोरकर स्वीकारतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

२०२२ च्या निवडणुकीत आरजीच्या काही उमेदवारांना पडलेली मते

सांत आंद्रे : वरिश बोरकर - ५,३९५ मते (विजयी), फ्रान्सिस सिल्चेरा (भाजप) -५,३१९ मते, अँथनी फर्नाडिस (काँग्रेस) - २,६९५ मते, वाळपई : मनोज (तुकाराम) परब - ६, ३७७ मते (द्वितीय क्रमांक), थिवी : ५,०५१ मते (तृतीय क्रमांक), नुबे : अरविंद डिसोझा - ३,३५८ मते (द्वितीय क्रमांक). याशिवाय शिवोली, सांताक्रुझ, कळंगुट, पर्ये, प्रियोळ, मये, पेडणे, बाणावली, शिरोडा, वेळ्ळी, मडकई आणि कुडतरी या मतदारसंघांत आरजीच्या उमेदवारांना २,५०० हून अधिक मते मिळाली होती.

logo
Pudhari News
pudhari.news