Global Business Summit 
गोवा

Global Business Summit | व्हायब्रंट गोवा ग्लोबल बिजनेस समिटला उद्यापासून प्रारंभ

Global Business Summit | 50 हून अधिक देश; 500 अंतरराष्ट्रीय खरेदीदार होणार सहभागी, 200 हून अधिक प्रदर्शन स्टॉल्स

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्याला जागतिक व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या नकाशावर अधिक बळकटपणे प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने व्हायब्रंट गोवा ग्लोबल बिजनेस समिट (व्हीजीजीबीएस) २०२६ चे आयोजन २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. ताळगाव पठार येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर परिषदेत ५० हून अधिक देशातील प्रतिनिधी, ५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार, २०० हून अधिक प्रदर्शन स्टॉल्स आणि १० हजारांहून अधिक व्यावसायिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

यावेळी बोलताना व्हायब्रंट गोवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार कामत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, व्हायब्रंट गोवा फाउंडेशनतर्फे गोवा सरकारच्या सहकार्याने या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गुंतवणूक, व्यापार, निर्यात, तंत्रज्ञान सहकार्य आणि व्यावसायिक भागीदारीच्या संधी निर्माण करण्यावर परिषदेत भर दिला जाणार आहे.

परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुखपाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. २९ ऑक्टोबरला होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमात ते 'गोव्याची वाढ आणि जागतिक महत्त्वाकांक्षा' या विषयावर आपले विचार मांडतील. ३१ ऑक्टोबरच्या समापन सोहळ्यालाही मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

यावेळी विनय वर्मा, मनोज पाटील, गौतम भाई, अजय ग्रामोपाध्ये, रसिक नाईक व मिलिंद हे उपस्थित होते. हिरो एंटरप्राइजेजचे अध्यक्ष सुनील कांत मुंजाल उद्घटनाच्या प्रमुख वक्त्यांपैकी एक असून, ते 'भारताचे औद्योगिक नेतृत्व आणि जागतिक स्पर्धात्मकता' या विषयावर भाषण करतील. माजी क्रिकेटपटू कपिल देव समारोप सोहळ्याला विशेष पाहुणे म्हणून राहून 'बियाँड बाउंड्रीज' या विषयावर विशेष संवाद साधणार आहेत.

याशिवाय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. चित्रपट अभिनेते सचिन पिळगावकर हे सुद्धा उपस्थिती लावणारे आहेत. 'इन्वेस्ट इन गोवा', स्टार्ट अप्स आणि एमएसएमईमधील गुंतवणूक, युवकांसाठी रोजगार व उद्योजकता, एमएसएमई ग्रोथ कॅपिटल, कौशल्य विकास आणि व्यवसाय विस्तार यावरही स्वतंत्र सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

महिला सक्षमीकरणासाठी विशेष चर्चासत्र


महिला सक्षमीकरणासाठी विशेष चर्चासत्र २९ ऑक्टोबरला होणार आहे. महिला उद्योजक, व्यावसायिक आणि जागतिक स्तरावरील महिला नेतृत्व यामध्ये सहभागी होणार आहेत. ३१ ऑक्टोबरला काँग्रेसची (चेंबर ऑफ ग्लोबल गोअन इंटरप्रेन्युअर्स) परिषद होणार आहे.

ब्रिटन, पोर्तुगाल, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि भारतातील जागतिक गोमंतकीय उद्योजक या संमेलनात सहभागी होतील. एका दिवसात सर्वाधिक पॉडकास्टचा विक्रम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विविध देशांसाठी स्वतंत्र सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वाधिक पॉडकास्ट रिकॉर्ड करण्याचा जागतिक विक्रम


या परिषदेत एका दिवसात सर्वाधिक पॉडकास्ट रेकॉर्ड करण्याचा विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जागतिक व्यावसायिक नेते, स्टार्टअप संस्थापक, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांच्या संवादांची या उपक्रमातून नोंद केली जाणार आहे. गोव्यातील व्यवसायांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश, संभाव्य खरेदीदार व भागीदार शोधणे, संयुक्त उपक्रम, तंत्रज्ञान भागीदारी, वितरण आणि बाजारपेठ विस्ताराच्या संधी या परिषदेतून उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT