वास्को : पुढारी वृत्तसेवा
विनयभंग करणे, महिलेला सँडल, मुठीने मारहाण करणे, चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देणे, एका पुरुषाला नाहक मारहाण करणे वगैरे गुन्ह्यासाठी वेर्णा पोलिसांनी चारजणांना अटक केली.
त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता, तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिर्ला-उपासनगर येथे राहणारे एक इसम, त्यांची पत्नी व मेव्हणी असे तिघेजण कारने सोमवारी (ता. २९) सायंकाळी ६.४५ च्या दरम्यान आपल्या फ्लॅटकडे जात होते.
यावेळी उपासनगर येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील टोफिक बादशाह शेख याने कारण नसताना चुकीने बाजूने कारसमोर दुचाकी आडवी घालून अडविले. त्यानंतर त्यांना अश्लील शिव्या देण्यास आरंभ केला.
एवढ्यावर न थांबता टोफिक याने त्या इसमाला ढकलले. यानंतर टोफिकने फोन करून आपल्या तीन मित्रांना तेथे बोलाविले. त्याचे तीन मित्र दोन दुचाकीसह तेथे पोहचले. त्या तिघांपैकी अदनान शेख याने त्या इसमाला ढकलले. त्याचा बचाव करण्यासाठी त्याची पत्नी पुढे आली असता तिचा विनयभंग केला.
टोफिक शेख, आयक्रान जागिरदार व मीझान सयद या तिघांनी त्या इसमाच्या मेव्हणीला ढकल्याने ती जमिनीवर पडली. त्यांनी तिला मारहाण केली. टोफिक आपल्या दुचाकीच्या डिकीतून चाकू काढून 'जिंदा काट ढुंगा' असे म्हणत सर्वाना धमकावले.
संशयित दुचाकींनी पसार झाले. याप्रकरणी वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली असून संशयितांना अटक करण्यात आली. टोफिक शेख, आयक्रान जागिरदार, मीझान सयद (सर्वजण हाऊसिंग बोर्ड, उपासनगर) अदनान शेख (टायटन चौक वेर्णा) यांच्याविरोधात भारतीय न्यास संहिता २०२३ च्या १२६ (२), ३५२, ७४, ७९, ३५१ (३) आर डब्ल्यू (३(५) कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.