

पणजी : पुढारी वृत्तसेवा
जन्मदात्या आईला दारूच्या नशेत अमानुष मारहाण केल्याने तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला तिचा मुलगा संदीप वेर्लेकर याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली मेरश येथील सत्र न्यायालयाने सहा वर्षे व सहा महिन्यांची कैदेची शिक्षा ठोठावली आहे.
आरोपीने हा हल्ला नशेत केल्याने ठार मारण्याचा त्याचा हेतू नसल्याचे निष्कर्ष न्यायालयाने निवाड्यात काढला आहे. जुने गोवे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
पोलिसांनी आरोपपत्रात सादर केलेल्या प्रथमदर्शनी पुराव्याच्या आधारे खुनाच्या आरोपाखाली संशयित संदिप वेर्लेकर याच्याविरुद्ध आरोपपही निश्चित झाले. खटल्यावरील सुनावणीवेळी मारहाण करताना पाहणारा एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने न्यायालयाने खुनाच्या आरोपाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते.
अशी घडली होती घटना
जुने गोवे राहत असलेला आरोपी संदीप वेर्लेकर हा मद्यपी होता व त्यामुळे तो नेहमीप्रमाणे मद्याच्या नशेत १८ नोव्हेंबर २०१९ रोजी घरी आला. घरात आजारी असलेल्या आईला त्याने मारहाण केली. तिने आरडाओरड केल्यावर घरातील इतर सदस्य मदतीला धावून आले.
तिला लगेच गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती जुने गोवे पोलिसांना मिळाल्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला व संदीपला या अटक झाली.