

• गोव्यात ‘कुशावती’ नावाचा तिसरा जिल्हा जाहीर
• धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण तालुक्यांचा समावेश
• चालुक्यकालीन कुशावती नदीवरून जिल्ह्याला नाव
• लहान जिल्ह्यांच्या संकल्पनेतून सुशासनाचा उद्देश
पणजी : पुढारी वृत्तसेवा
16 लाख लोकसंख्येच्या गोव्यामध्ये आतापर्यंत उत्तर गोवा आणि दक्षिण असे दोन जिल्हे होते, आजपासून कुशावती या नावाने तिसरा जिल्हा स्थापन झालेला आहे. बुधवारी मंत्रालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. दक्षिण गोव्यातील धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण या चार ग्रामीण तालुक्यांचा मिळून हा कुशावती जिल्हा तयार करण्यात आलेला आहे .
या चारही तालुक्यातून वाहणारी कुशावती ही नदी असून गोव्यावर चालुक्यांच्या राजवटीमध्ये ती प्रसिद्ध नदी होती तेथे मोठ्या प्रमाणात जल वाहतूक होत होती. चारही तालुके याच नदीच्या तीरावर आहेत त्यामुळे कुशावती हे नाव देण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितले.
येत्या काळामध्ये तिसराजिल्हा स्थापण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, त्यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध होणार आहे. लवकरच गोवा सरकार केंद्राला त्या बाबत पत्र लिहिणार असल्याचे सांगून सध्या दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात बसूनच नवे जिल्हाधिकारी तिसऱ्या कुशावती जिल्ह्याचा कारभार हाताळणार असल्याचे मुख्यमंत्री डॉक्टर सावंत म्हणाले.
जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी ज्या ठिकाणाहून बस सेवा उपलब्ध नाही तेथून बस सेवा उपलब्ध करून जिल्ह्याचे ठिकाणी येणे सुलभ केले जाणार असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण जनतेला चांगले सुशासन देण्यासाठी लहान-लहान जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार देशभरामध्ये 120 नवे जिल्हे स्थापन होत असून गोव्यात स्थापन झालेला कुशावती हा जिल्हा त्याचाच भाग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले
नव्या जिल्ह्यातील गावे
धारबांदोडा तालुका - धारबांदोडा, शिगाव, मोले, साकोर्डा, तांबडी सुर्ला. सांगे तालुका सांगे, उगे, नेत्रावळी, साळावली, रिवण. केपे तालुका केपे, कुडचडे, सावर्डे, फातर्फा, बाळ्ळी. काणकोण तालुका - पळोळे, आगोंद, खोला, पैंगीण.