म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
गणेश चतुर्थीचा सण तोंडावर आला असतानाच म्हापसा बाजारपेठेत भाज्या आणि नारळाच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडू लागला आहे. श्रावण महिन्यात भाज्यांची मागणी वाढली असून, शेजारी राज्यांतून दाखल होणाऱ्या भाज्यांच्या वाढत्या दराचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही दिसून येत आहे.
सणासुदीच्या काळात नारळाच्या दरातही वाढ झाली असून, सध्या आकारानुसार नारळ ४० ते ७० रुपये प्रतिनग दराने विकला जात आहे. लहान आकाराचा नारळ ३५ ते ४० रुपये, मध्यम आकाराचा नारळ सुमारे ५० रुपये, तर मोठ्या आकाराचा नारळ ६० ते ७० रुपये दराने विक्रीस उपलब्ध आहे. चतुर्थीच्या काळात बाप्पाच्या नैवेद्यासाठी नारळाला मोठी मागणी असते.
त्यामुळे दर वाढले असले तरी ग्राहकांना नारळाची खरेदी करावी लागत आहे. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात देवकृत्यांसाठी तसेच गणेश चतुर्थीसाठी लागणारे उतरलेले नारळ बाजारपेठेत उपलब्ध असून, त्याचा दर १५० ते २०० रुपये एक याप्रमाणे आहे.शेजारी राज्यांतून येणाऱ्या भेंडीच्या तुलनेत गावठी भेंडीला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
शेजारी राज्यांतून येणाऱ्या भेंडीच्या तुलनेत गावठी भेंडीला ग्राहकांची पसंती मिळत आहे. बाहेरून येणारी भेंडी ६० रुपये किलो दराने उपलब्ध असून, गावठी भेंडीला चांगली मागणी आहे. म्हापसा बाजारपेठेत गावठी चिबूडही विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
आकारानुसार चिबूड १०० ते २०० रुपये प्रतिनग दराने विकले जात आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत काही भाज्यांच्या दरात किंचित वाढ झाली असून, काही भाज्यांचे दर स्थिर आहेत. कारले, सुरण, शिमला मिरची, कांदा आणि मिरची यांच्या दरात वाढ झाली आहे.