Sanika Dhuri Konkani Actress | रंगभूमीचा ध्यास घेतलेली अष्टपैलू अभिनेत्री सानिका धुरी; म्हापसा ते राष्ट्रीय मंचापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!

Sanika Dhuri Konkani Actress | ग्रामीण रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही, तर गावागावातील कलाकारांच्या निःस्वार्थ साधेनेतून जपलेली गेलेली सांस्कृतिक चळवळ आहे.
Sanika Dhuri Konkani Actress
Sanika Dhuri Konkani Actress
Published on
Updated on

निवृत्ती शिरोडकर (रंगयात्रा)
ग्रामीण रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही, तर गावागावातील कलाकारांच्या निःस्वार्थ साधेनेतून जपलेली गेलेली सांस्कृतिक चळवळ आहे. मानधन किती मिळेल, प्रसिद्धी मिळेल की नाही किंवा आपल्या नावाची चर्चा होईल का, याचा विचार न करता केवळ रंगदेवतेच्या प्रेमापोटी रंगमंचावर उभे राहणारे अनेक कलाकार आजही ग्रामीण भागात आहेत.

Sanika Dhuri Konkani Actress
Solapur Flight Services: सोलापूर-गोवा, बंगळुरु, हैदराबाद विमानसेवा मृगजळच

संसार, मुलाबाळांचे शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून रंगभूमी आणि लोककलेशी आपले नाते जपणाऱ्या अशाच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे सानिका समीर धुरी होय.
२६ फेब्रुवारी १९८० रोजी म्हापसा येथे जन्मलेल्या सानिका धुरी यांच्या मनात कलेचे बीज विद्यार्थी दशेतच रुजले.

शालेय-महाविद्यालयीन जीवनात गॅदरिंग, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धात्मक नृत्यांमध्ये त्या उत्साहाने सहभागी होत असत. त्या काळात मिळालेल्या संधीने त्यांच्या मनातील कलाकाराला आकार दिला आणि पुढे हाच कलाप्रवास रंगभूमीपर्यंत पोहोचला.
सानिका धुरी यांनी २०१४ मध्ये 'करीन ती पूर्व' या नाटकातून नाट्यक्षेत्रात पदार्पण केले.

Sanika Dhuri Konkani Actress
Lodha One Goa Project | लोढा कंपनीच्या 'वन गोवा' प्रकल्पासाठी 6 कोटींची खंडणी

कासारवर्णे येथील श्री सातेरी महादेव समितीने नाटकासाठी दिलेले प्रोत्साहन आणि पाठिंबा आपल्या रंगभूमीवरील प्रवेशासाठी महत्त्वाचा ठरल्याचे त्या आवर्जून सांगतात. पहिल्या नाटकानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढे 'इथे उशाला मृत्यू', 'किरवंत', 'रायगडाला जेव्हा जाग येते' यासारख्या नाटकांमध्ये विविध भूमिका साकारत त्यांनी अभिनयाची वाट अधिक भक्कम केली.
सानिका यांच्यासाठी नाटक म्हणजे केवळ प्रयोगाच्या दिवशी रंगमंचावर जाऊन भूमिका साकारणे नव्हे. एखादे नाटक स्वीकारल्यानंतर किमान महिनाभर तालमीसाठी वेळ देण्याची त्यांची तयारी असते. नाटकाचे वाचन सुरू असतानाच अनेक संवाद आपोआप पाठ होत जातात, असे त्या सांगतात.

व्यक्तिरेखा समजून घेणे, संवादांमागील भावना ओळखणे, रंगमंचावरील हालचाली आणि सहकलाकारांशी असलेला समन्वय या प्रत्येक बाबीकडे त्या गांभीर्याने पाहतात. रंगमंचावर पाऊल ठेवल्यानंतर कलाकाराने स्वतःला विसरून त्या पात्रात शिरले पाहिजे, तेव्हाच भूमिका प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचते, असे सानिका सांगतात.
सानिका धुरी यांची कला नाटकापुरती सीमित नाही. गोव्याच्या पारंपरिक लोकसंस्कृतीबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा आहे. लोकनृत्य, समई नृत्य, फुगडी, देखणी आणि कांटी डान्स अशा विविध कलाप्रकारांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

गोव्याची लोककला आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, तिचे संवर्धन व्हावे आणि नव्या पिढीला आपल्या पारंपरिक कलांची ओळख व्हावी, या भावनेतून त्या या क्षेत्रात सक्रिय आहेत. विविध समूहांच्या माध्यमातून त्यांनी गोव्यात, राज्याबाहेर तसेच देशापातळीवरील विविध ठिकाणी तीनशेहून अधिक लोककला कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.

या कार्यक्रमांतून गोव्याच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवत त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.
घर, संसार आणि मुलाबाळांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळताना स्वतःमधील कलाकार जिवंत ठेवणे सोपे नसते. दैनंदिन जबाबदाऱ्यांचा न्याय देत तालमीसाठी वेळ काढणे, कार्यक्रमांसाठी प्रवास करणे, रात्री उशिरापर्यंत नाट्यप्रयोगात सहभागी होणे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कौटुंबिक जबाबदाऱ्यांना सामोरे जाने, या सगळ्यामागे मोठी मेहनत असते.

सानिका धुरी यांनी या दोन्ही आघाड्यांवर समतोल साधत आपली कलासाधना सुरू ठेवली आहे. घरच्यांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळेच विविध कलाप्रकार आत्मसात करता आले आणि सातत्याने कार्यक्रम करता आले, असे त्या सांगतात.
प्रत्येक कलाकाराच्या वाटचालीत योग्य वेळी मिळालेले मार्गदर्शन महत्त्वाचे असते. सानिका आपल्या नाट्यप्रवासात आनंद नाईक यांना गुरुस्थानी मानतात. नाट्यक्षेत्रात योग्य वेळी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अभिनयाला दिशा मिळाली आणि रंगभूमीवर पुढे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला, असे त्या सांगतात.

स्वतः उत्तम कलाकार होण्यासाठी केवळ स्वतःच्या भूमिका करणे पुरेसे नसते, तर इतर कलाकारांचे नाट्यप्रयोग पाहणेही तितकेच आवश्यक असल्याचे सानिका मानतात. दुसऱ्या कलाकारांचा अभिनय पाहताना त्या स्वतःच्या अभिनयाचेही आत्मपरीक्षण करतात.

संवादफेक अधिक परिणामकारक कशी करता येईल, एखाद्या प्रसंगातील भावना आणखी प्रभावीपणे कशा व्यक्त करता येतील आणि आपल्या अभिनयातील त्रुटी कोणत्या आहेत, यावर विचार त्या करतात. मराठी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर या त्यांच्या आवडत्या अभिनेत्री आहेत.

ग्रामीण भागात रंगभूमीची सेवा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असे सानिका सांगतात. गावातील एका नाट्यप्रयोगाच्या वेळी काही व्यक्तींनी नाटक सुरू असताना जाणीवपूर्वक वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केल्याचा अनुभवही त्या सांगतात.

मात्र अशा अडचणींमुळे कलेपासून दूर जाण्याऐवजी अधिक जिद्दीने रंगभूमीशी जोडलेले राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. कलाकाराच्या वाट्याला कौतुक येते, टाळ्या मिळतात; पण त्याचबरोबर टीका, विरोध आणि अडथळेही येतात. या सगळ्यावर मात करून रंगमंचावर टिकून राहण्यातच कलाकाराची खरी परीक्षा असते.

राज्य आणि राज्याबाहेर होणाऱ्या स्पर्धात्मक नाट्यप्रयोगांच्या परीक्षणाबाबतही सानिका स्पष्ट मत व्यक्त करतात. काही स्पर्धांमध्ये परीक्षण अधिक पारदर्शक आणि गुणवत्तेकेंद्रित होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे मत आहे. काही वेळा गुणवत्तेपेक्षा ओळखीच्या संस्था अथवा कलाकारांना प्राधान्य मिळत असल्याची भावना कलाकारांमध्ये निर्माण होते, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकाराच्या मेहनतीला न्याय मिळण्यासाठी परीक्षण निष्पक्ष आणि पारदर्शक असणे आवश्यक असल्याचे त्या सांगतात.

नवोदित कलाकारांसाठी सानिका यांचा संदेश साधा; पण महत्त्वाचा आहे. 'आवड असेल तर सवड मिळते.' नाटकात येण्याची मनापासून आवड असली पाहिजे. केवळ रंगमंचावर दिसण्याची इच्छा असून चालत नाही; अभिनयाचे योग्य प्रशिक्षण घेणे, तालमींना वेळ देणे, संवादफेक सुधारणे आणि सतत शिकण्याची तयारी ठेवणे आवश्यक असल्याचे त्या सांगतात. नाटक हे एका कलाकाराचे नसते. प्रत्येक भूमिका उत्कृष्ट झाली तरच संपूर्ण नाटक प्रभावी होते. त्यामुळे कलाकार, सहकलाकार, दिग्दर्शक आणि पडद्यामागील सर्व घटकांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. नाटकाच्या यशासाठी सांघिक प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे त्या आवर्जून सांगतात.

लोककला ही केवळ मनोरंजन नसते; ती आपल्या संस्कृतीची ओळख आणि पूर्वजांनी दिलेला वारसा असते. आज मनोरंजनाची माध्यमे झपाट्याने बदलत असून मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या युगात पारंपरिक लोककलांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत.

अशा काळात फुगडी, देखणी, समई नृत्य आणि इतर लोकनृत्य प्रकार सादर करणाऱ्या कलाकारांचे योगदान विशेष महत्त्वाचे ठरते. हा वारसा रंगमंचावर जिवंत ठेवण्याचे कार्य सानिका धुरी यांच्यासारख्या कलाकारांकडून होत आहे. सानिका धुरी यांच्या कलाप्रवासात स्वतः कलाकार होण्याबरोबरच नव्या कलाकारांना घडवण्याची इच्छाही महत्त्वाची आहे.

Sanika Dhuri Konkani Actress
Solapur Flight Services: सोलापूर-गोवा, बंगळुरु, हैदराबाद विमानसेवा मृगजळच

आपल्या कलेतून दुसऱ्या व्यक्तीला प्रेरणा मिळावी, एखाद्या नवोदित कलाकाराने रंगमंचावर पहिले पाऊल ठेवावे किंवा एखाद्या मुलामुलीच्या मनात लोककलेविषयी प्रेम निर्माण व्हावे, तर आपली साधना अधिक अर्थपूर्ण ठरते, असे त्यांना वाटते. त्यांच्या कलाप्रवासातून ग्रामीण भागातील महिलांसाठीही एक सकारात्मक संदेश मिळतो.

कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आवड यांचा समतोल साधत सातत्याने काम करता येते, याचे उदाहरण त्यांच्या प्रवासातून दिसते. कलेसाठी वेळ देताना घरच्यांचा पाठिंबा, नियोजन आणि स्वतःची जिद्द या तीनही गोष्टी आवश्यक असल्याचे त्या मानतात. ग्रामीण कलाकारांना योग्य संधी, प्रशिक्षण मिळाल्यास गोव्याच्या सांस्कृतिक वारशाला नवी ऊर्जा मिळू शकते. नव्या पिढीलाही प्रेरणा मिळेल.

Sanika Dhuri Konkani Actress
Rajnath Singh| गोवा मुक्तिसंग्रामातील एकही हुतात्म्याचे नाव सुटता कामा नये

महाराष्ट्रासह दिल्लीतही गौरव

कलेच्या क्षेत्रातील त्यांच्या वाटचालीची विविध ठिकाणी दखल घेतली आहे. दिल्ली तसेच महाराष्ट्रात झालेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा गौरव करण्यात आल्याचे त्या सांगतात. सरकार तसेच कला आणि संस्कृती खात्याकडून कलाकारांना वेळोवेळी मिळणारे प्रोत्साहन महत्त्वाचे असल्याचे त्यांचे मत आहे. ग्रामीण कलाकारांना अधिकाधिक व्यासपीठ उपलब्ध झाले तर अनेक गुणी कलाकार पुढे येऊ शकतात, असा त्यांचा विश्वास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news