दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
मुरगाव पालिकेने गेल्यावर्षी वास्को शहरातील काही रस्त्यावर पे पार्किंग करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी काही रस्त्यावर वाहन पार्किंग करणाऱ्या जागेवर पांढऱ्या पट्ट्या तयार केल्या आहे. शहरात १४ जानेवारी पासून पे पार्किंग करण्याचा निर्णय मुरगाव पालिकेने घेतला असल्याचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी सांगितले.
वाहन चालकांनी पालिकेच्या पे पार्किंग नियमाचे पालन करण्याचे आवाहन नगराध्यक्ष बोरकर यांनी केले आहे. पणजी महानगरपालिकेने सर्व प्रथम राज्यात पे पार्किंग योजना सुरू केली. त्यांना वाहन चालकाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच पद्धतीने वास्को शहरात येणाऱ्या वाहन चालकांनी मुरगाव पालिकेच्या पे पार्किंग योजनेला सहकार्य करण्याचे आवाहन मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी केले आहे. वा
स्को शहरातील अनेक रस्त्यावर वाहन चालक, वाहतूक नियमाचे पालन करीत नसल्याचे नजरेस पडते. यात दुचाकी पार्किंग मध्ये चारचाकी तर चारचाकी पार्किंग मध्ये दुचाकी पार्क केली जाते. त्यामुळे शहरात काही कामा निमित्त येणाऱ्या इतर तालुक्यातील वाहन चालकांना वाहन पार्क करण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागतो.
यासाठी पालिकेने गेल्या वर्षी पालिका बैठकीत निर्णय घेऊन शहरातील काही रस्त्यावर पे पार्किंग आकारण्याचा निर्णय एकमताने मंजूर केला होता. मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी वास्को वाहतूक पोलीस निरीक्षक ऍलविटो रॉड्रिग्ज यांच्या समवेत पे पार्किंग आकारण्यात येणाऱ्या जागेची पाहणी केली.
यात मुरगाव पालिकेच्या इमारतीच्या बाजूस असलेल्या पोस्ट कार्यालय समोरच्या जागेत चार चाकी वाहने. तर दामोदर मंगलजी कार्यालय ते नम्रता ट्रेडिंग समोर पर्यन्त चार चाकी वाहन पार्किंगसाठी पे पार्किंग आकारण्यात येणार आहे. तसेच मुरगाव पालिकेतील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर चार चाकी वाहनांसाठी पे पार्किंग आकारण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.